जेएनपीटी परिसरात २६ लाखांचे केमीकल जप्त
By admin | Published: September 12, 2014 12:52 AM2014-09-12T00:52:27+5:302014-09-12T00:52:27+5:30
न्हावा शिवा येथून २६ लाखाचे २७ हजार ४०० लिटर चोरीचे केमिकल जप्त केले आहे.
नवी मुंबई : न्हावा शिवा येथून २६ लाखाचे २७ हजार ४०० लिटर चोरीचे केमिकल जप्त केले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्यावर न्हावा शिवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट २ ने न्हावा शिवा कंटेनर यार्ड लगत मंगळवारी रात्री ही कारवाई केली आहे. तेथे टँकर मधून केमिकल चोरी होत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली युनिट २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी एका टँकरमधून केमिकल चोरी होत असल्याचे आढळून आले. २६ हजार लिटर क्षमतेच्या या टँकर (एम.एच ४३ यु ५३७९) मध्ये एमईजी (मोनो इथेनॉल ग्रीस) नावाचे केमिकल होते. टँकर चालकाच्या मदतीने हा प्रकार सुरु होता. त्यानुसार पोळ यांच्या पथकाने छापा टाकून तिघांना अटक केली. त्यामध्ये चालक चंद्रदेव यादव (४८), अब्दुल मन्नान अतिम मलिक (५२) आणि बजरंगी यादव (२८) यांचा समावेश आहे. या कारवाईत घटना स्थळावरून एमईजी नावाच्या केमिकलने भरलेले २०० लिटर क्षमतेचे ७ ड्रम देखील जप्त केले. याप्रकरणी अटक न्हावा शेवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)