हरियाणातील पदवीधर ठग पोलिसांच्या जाळ्यात, पेमेंट गेटवे खात्याद्वारे २६ लाखांना चुना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 05:50 AM2024-11-04T05:50:53+5:302024-11-04T05:53:00+5:30

Online Fraud News: पेमेंट गेटवेच्या व्हर्च्युअल खात्याचा वापर करून फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित दुकलीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हितेश सिंग (३०) आणि साहिल कुमार (३५) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

26 lakhs through payment gateway accounts in the net of graduate thug police in Haryana | हरियाणातील पदवीधर ठग पोलिसांच्या जाळ्यात, पेमेंट गेटवे खात्याद्वारे २६ लाखांना चुना

हरियाणातील पदवीधर ठग पोलिसांच्या जाळ्यात, पेमेंट गेटवे खात्याद्वारे २६ लाखांना चुना

 मुंबई -  पेमेंट गेटवेच्या व्हर्च्युअल खात्याचा वापर करून फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित दुकलीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हितेश सिंग (३०) आणि साहिल कुमार (३५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते पेमेंट गेटवेचे वितरक असून, दोघांनीही विज्ञान शाखेतून पदवी घेतली आहे.

दोघेही हरियाणात मोबाइल शॉपी चालवितात. त्यांना हरियाणात अटक करून मुंबईत आणले गेले. पेमेंट गेटवे कंपनीच्या व्यवस्थापकाने बीकेसीच्या पश्चिम क्षेत्राच्या सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्यांच्या कंपनीची २६ लाख रुपयांची फसवणूक झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन आरोपींनी पेमेंट गेटवेची डिस्ट्रिब्युटरशिप घेतली. जर कोणताही ग्राहक त्यांच्याकडे आला आणि त्यांच्यामार्फत पैसे हस्तांतरित केले, तर ते त्यांच्या वॉलेटमधून कंपनीच्या आभासी खात्यात जात होते. दोन आरोपींना त्यांच्या सेवा पुरविण्यासाठी कंपनीकडून कमिशन मिळत होते. कंपनी वितरकांना क्रेडिट देईल आणि वितरकांकडून मिळालेली रक्कम क्लिअर करेल, असे त्यांचे कामाचे स्वरूप होते. मात्र, दोन्ही आरोपींनी कंपनीच्या खात्याचा गैरवापर केला. त्यांना कंपनीच्या खात्यात फसवणूक झालेल्यांचे पैसे मिळाले. मात्र, त्यांनी ते पैसे परस्पर फसवणूक करणाऱ्यांच्या अन्य खात्यांमध्ये वळविल्याचे पोलिसांनी सांगितले.

३५ हून अधिक फसवणुकीच्या तक्रारी
सिंगला १२ लाख तर कुमारला फसवणुकीतील १४ लाख रुपये मिळाले. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी)ला फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कंपनीचे एक आभासी खातेही गोठविण्यात आले आहे. तक्रार दाखल करणाऱ्या अनेक पीडितांना कंपनीला २६ लाख रुपये परत करावे लागले होते. एनसीआरपीमध्ये दोन आरोपींच्या खात्यांविरुद्ध ३५ हून अधिक फसवणुकीच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

क्रिप्टोकरन्सी खरेदी 
तपासादरम्यान, आरोपी क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी पैसे दुसऱ्या फरार आरोपीच्या क्रिप्टो खात्यात पाठवायचा. त्यानंतर, आरोपीला कमिशन मिळत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: 26 lakhs through payment gateway accounts in the net of graduate thug police in Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.