छत्तीसगढमधील रेल्वेमार्गासाठी महानिर्मितीची २६ टक्के भागीदारी
By यदू जोशी | Published: April 10, 2018 05:06 AM2018-04-10T05:06:52+5:302018-04-10T05:06:52+5:30
छत्तीसगढमधील कटघोरा-डोंगरगड हा २७० किलोमीटरचा रेल्वेमार्ग उभारण्यास ४८२० कोटी खर्च करण्यात येणार असून त्यातील २६ टक्के आर्थिक भार महाराष्ट्र शासनाची महानिर्मिती कंपनी उचलणार आहे.
मुंबई : छत्तीसगढमधील कटघोरा-डोंगरगड हा २७० किलोमीटरचा रेल्वेमार्ग उभारण्यास ४८२० कोटी खर्च करण्यात येणार असून त्यातील २६ टक्के आर्थिक भार महाराष्ट्र शासनाची महानिर्मिती कंपनी उचलणार आहे. त्या माध्यमातून चंद्रपूर, कोराडी आणि परळी येथील वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी लागणारा कोळसा छत्तीसगढमधून आणला जाणार आहे.
या तीन वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने छत्तीसगढमधील गरे पालमा सेक्टर २ ही कोळसा खाण महानिर्मितीस मार्च २०१५ मध्येच मंजूर केली होती. या खाणीतून पुढील ३० वर्षांसाठी महाराष्ट्रातील वीज प्रकल्पांना कोळसा मिळणार आहे. केंद्रीय खाण मंत्रालय आणि महानिर्मिती यांच्यात ३१ आॅगस्ट २०१५ रोजी करारही झाला होता. सुरुवातीला हा कोळसा झार्सुगुडा-नागपूर या रेल्वे विभागातील रेल्वे मार्गावरून आणला जाणार होता. परंतु या सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा भार लक्षात घेता समांतर दुसरा मार्ग उभारण्याचा पर्याय समोर आला.
त्याचवेळी असे लक्षात आले की समांतर ठरेल अशा कटघोरा-डोंगरगड रेल्वे मार्गाला छत्तीसगढ शासनाकडून आधीच मंजुरी देण्यात आली होती. केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि छत्तीसगढ सरकार (छत्तीसगढ रेल कॉर्पोरेशन लि.) हे ४९:५१ टक्के भागीदारीत सदर रेल्वे कॅरिडॉरची उभारणी करणार होते. याच मार्गावरून गरे पालमा सेक्टर २ या कोळसा खाणीतून कोळसा राज्यात आणता यावा म्हणून या रेल्वेमार्गाच्या उभारणीत महानिर्मितीस तसेच साऊथ-ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (एसईसीएल) या कोळसा निर्मिती कंपनीसही भागीदारी देण्यास छत्तीसगढ शासनाने अनुकूलता दर्शविली आहे. कटघोरा-डोंगरगड हा रेल्वेमार्ग डोंगरगडला जोडला जाईल आणि कोळसा महाराष्ट्रात येईल.
या रेल्वेमार्गाच्या उभारणीत महानिर्मितीच्या २६ टक्के भागीदारीस राज्याच्या वित्त विभागाने तसेच नियोजन विभागाने मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येण्याची शक्यता आहे. ४ हजार ८२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पातील ८० टक्के रक्कम म्हणजे ३ हजार ८५६ कोटी रुपये छत्तीसगढ रेल कॉर्पोरेशन, एसईसीएल आणि महानिर्मिती यांच्या मिळून उभारण्यात येणाऱ्या विशेष उद्देश कंपनीमार्फत (एसपीव्ही) कर्ज स्वरूपात उभारण्यात येईल. कर्जातील महानिर्मितीचा वाटा २६ टक्के म्हणजे १ हजार २ कोटी रुपये इतका असेल व भागभांडवलापोटीचा वाटा २५० कोटी रुपये असेल. या मार्गावर प्रवासी वाहतुकीबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालय घेईल.