पालिका कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये बोनस? प्रशासनाकडून २६० कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:29 PM2024-10-15T12:29:14+5:302024-10-15T12:29:46+5:30
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासन देईल तेवढ्याच रकमेवर कर्मचाऱ्यांना समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच राज्य सरकारच्या मध्यस्थीने आणखी काही वाढ मिळविता येईल का, यासाठी कामगार संघटना प्रयत्नशील आहेत.
मुंबई : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये दिवाळी बोनस मिळण्याचे संकेत असून, यासंदर्भात याच आठवड्यात घोषणा होईल. २६ हजार रुपये बोनस देण्यासाठी पालिका प्रशासनाने २६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. २६ हजारांपेक्षा जास्त बोनस देण्याच्या मन:स्थितीत प्रशासन नसल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासन देईल तेवढ्याच रकमेवर कर्मचाऱ्यांना समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच राज्य सरकारच्या मध्यस्थीने आणखी काही वाढ मिळविता येईल का, यासाठी कामगार संघटना प्रयत्नशील आहेत. यापूर्वी बोनसचा तिढा महापौरांच्या दालनात सुटत असे. २०२० साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर बोनसचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सोडवण्यात आला होता. त्यावेळी १५ हजार ५०० रुपये बोनस दिला जाणार होता. मात्र, ही रक्कम वाढवून २० हजार इतकी करण्यात आली. रक्कम वाढवताना पुढील तीन वर्षांत कोणत्याही प्रकारची वाढ मिळणार नाही, अशा प्रकारची अट टाकत प्रशासनाने कामगार संघटनांसोबत करार केला होता.
वाढीव रक्कम सरकारने द्यावी
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर पूर्वीचा करार मोडून ही रक्कम २२ हजार ५०० एवढी करण्यात आली. मागील दिवाळीत २६ हजार बोनस देण्यात आला.
यंदाही बोनसच्या रकमेत वाढ होईल, अशी कर्मचाऱ्यांना आशा आहे. दिवाळीपूर्वी आठ ते दहा दिवस आधी बोनस मिळावा, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते. त्यामुळे बोनसचा निर्णय त्वरित झाल्यास पुढील परिपत्रक आणि सर्व प्रकारचे सोपस्कार लक्षात घेता आठ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.
निर्णय घेण्यास वेळ लागल्यास बोनस मिळण्यात उशीर होईल. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय अपेक्षित आहे. सरकारने बोनसची रक्कम वाढवून देण्याची तयारी दर्शविल्यास उर्वरित वाढीव रक्कम सरकारने द्यावी, अशी विनंती पालिका प्रशासन सरकारला करेल, अशी शक्यता आहे.