मुंबई : एअर इंडियाच्या ताफ्यातील २६ वर्षे जुन्या ‘बी ७४७’ विमानांना निरोप देण्यात येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या; परंतु हवाई वाहतूक राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘बी ७४७’ विमाने एअर इंडियाच्या सेवेत कायम राहणार असल्याचे त्यांनी नुकतेच स्पष्ट केले.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात ब्रिटिश एअरवेजने आपल्या ताफ्यातील ३१ ‘बी ७४७’ विमानांची सेवा बंद केली होती. लॉकडाऊनमुळे एकीकडे हवाई वाहतूक क्षेत्र तोट्यात असताना जुन्या विमानांवरील अतिरिक्त खर्च कमी करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर एअर इंडियाही अशा प्रकारचा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांत सुरू झाल्या.
मात्र, नवनिर्वाचित हवाई वाहतूक राज्यमंत्री सिंग यांनी या चर्चांना विराम दिला. सध्या एअर इंडियाच्या ताफ्यात चार ‘बी ७४७’ विमाने आहेत. त्यांचे आयुर्मान जवळपास २६ वर्षे असून, त्यातील तीन विमाने देखभाल दुरुस्ती आणि चाचणीसाठी पाठविण्यात आली आहेत. या विमानांची सेवा बंद करण्याचा तूर्तास कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.