Monika More: 26 वर्षांच्या मोनिकाचे हात झाले दोन वर्षांचे, साजरे केले रक्षाबंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:39 PM2022-08-30T12:39:56+5:302022-08-30T12:40:08+5:30
Monika More: रेल्वे अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरे (वय २६) या तरुणीवर हाताचे प्रत्यारोपण करून नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करणारी राज्यातील ही पहिलीच घटना असून, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने मोनिकाच्या हातात बळकटी निर्माण झाली आहे.
मुंबई : रेल्वे अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरे (वय २६) या तरुणीवर हाताचे प्रत्यारोपण करून नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करणारी राज्यातील ही पहिलीच घटना असून, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने मोनिकाच्या हातात बळकटी निर्माण झाली आहे. हात नसताना कायम प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून असणारी मोनिका मिळालेल्या नवीन हातांमुळे बहुतांश गोष्टी स्वतःच करते. रक्षाबंधनाला पहिल्यांदा या हाताच्या साहाय्याने मी माझ्या भावाला ओवाळून राखी बांधू शकले, असे मोनिकाने नमूद केले.
कॉलेजमधून घरी येत असताना कुर्ला स्थानकावर २०१४ ला रेल्वे अपघातात मोनिका या तरुणीचे दोन्ही हात गमावले होते. त्यानंतर डॉक्टरांनी तिला प्रोस्थेसिस (नकली हात) बसविले होते. २८ ऑगस्ट २०२० रोजी या तरुणीवर हाताचे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया करण्यात आली. याकरिता ३२ वर्षीय एका मेंदूमृत व्यक्तीकडून हे हात मिळाले. याकरिता ते चेन्नईहून मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात आणण्यात आले होते. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली, त्याकरिता १५ तासांचा अवधी लागला होता.
मोनिका सांगते, “माझ्यावर हातांच्या प्रत्यारोपणाला दोन वर्षे पूर्ण झाली. आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. या हातांमुळे नवीन आयुष्य मला मिळाले आहे. मी सध्या रुग्णालयात रुग्ण समन्वयक या पदावर काम करत असून, काम करताना मला फार काही अडचणी येत नाही.”
मोनिकावर शस्त्रक्रिया करणारे प्लास्टिक सर्जन डॉ. नीलेश सातभाई म्हणाले, “सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने तिचा हाताचा वापर होत आहे, तो अतिशय चांगला आहे.
विशेष म्हणजे तिचा जो रंग आहे, तोच रंग तिच्या हातालाही प्राप्त झाला आहे. अजूनही तिची फिजिओथेरपी सुरूच आहे.”