‘दोनशे’च्या घड्याळासाठी सोसला २६ वर्षांचा वनवास, मालकाच्या विकृत वासनेची बळी, दोन वेळा केला गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 02:59 AM2018-01-20T02:59:59+5:302018-01-20T03:00:46+5:30
घड्याळ चोरताना मालकाने पकडले. तिच्या भीतीचा फायदा घेत मालकाने तिला टार्गेट केले. चोरी लपविण्यासाठी ती मालकाच्या विकृत वासनेची शिकार ठरली
मनीषा म्हात्रे
मुंबई : घड्याळ चोरताना मालकाने पकडले. तिच्या भीतीचा फायदा घेत मालकाने तिला टार्गेट केले. चोरी लपविण्यासाठी ती मालकाच्या विकृत वासनेची शिकार ठरली. त्याला नकार देताच मालकाच्या बहिणींकडून मारहाण सुरू झाली. अवघ्या दोनशे रुपयांच्या घड्याळासाठी २६ वर्षे तिचा शारीरिक, तसेच मानसिक छळ सुरू होता. दरम्यान, दोनदा तिचा गर्भपात करण्यात आला. तिसºयांदा ती गरोदर राहिली. सर्वांनी तिच्यामागे गर्भपातासाठी तगादा लावला. तिने नकार दिला, म्हणून मारहाण करून घराबाहेर काढले. त्यानंतर, तिने थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि २६ वर्षांच्या वनवासाला वाचा फुटली.
महिलेच्या तक्रारीवरून डायलेस तोडीवाल (५८) विरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार, मारहाण, शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची बहीण डायना (५०), रुक्साना(५५)सह डॉ. मिरपुरीला सहआरोपी बनविले आहे.
सध्या ताडदेव परिसरात ४५ वर्षीय रेश्मा (नावात बदल) राहते. लहानपणापासून ती गावदेवी येथील मझटा मेन्शन तोडीवालकडे घरकामासाठी होती. मुंबईत तिचे कुणीच नाही. १९९२ मध्ये नेहमीप्रमाणे घराची साफसफाई करत असताना, तेथील एक घड्याळ तिच्या नजरेस पडले. तिने ते लपविले. हीच बाब मालक तोडीवालच्या लक्षात आली. त्याने तिच्याकडील घड्याळ हिसकावले. पोलीस ठाण्यात नेण्याची भीती दाखवली. तिने माफी मागितली. पोलिसांकडे नेऊ नका, असे म्हणत, काहीही करण्यास तयार झाली.
याच भीतीचा फायदा घेत, तिच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या तोडीवालने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, हा त्याचा दिनक्रमच झाला. याबाबत रेश्माने तोडीवालच्या बहिणींना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनीही तिला मारझोड केली. गेली २६ वर्षे तिच्यावर लैंगिक, तसेच अनैसर्गिक अत्याचार सुरू होते.