युनियन बँकेला २६० कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 09:26 AM2023-05-27T09:26:13+5:302023-05-27T09:26:22+5:30
सीबीआयकडून पीएसएल कंपनीवर दुसरा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य प्रदेशातील चंबळ येथे प्रकल्प साकारण्यासाठी युनियन बँकेकडून ८५ कोटी रुपयांचे कर्ज घेत ते बुडविणाऱ्या मुंबईस्थित पीएसएल कंपनीविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी याच कंपनीने एक्झिम बँकेलाही १०५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीबीआयने कंपनी व तिच्या संचालकांविरोधात मुंबईतच गुन्हा दाखल केला आहे.
उद्योगासाठी लागणाऱ्या पाईपची निर्मिती व वितरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या पीएसएल कंपनीला चंबळ येथे एका प्रकल्पाचे काम मिळाले होते. त्यासाठी कंपनीने युनियन बँकेला ८५ कोटी रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. यापूर्वीही कंपनीने युनियन बँकेकडून १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले होते. या कर्जासाठी बँकेने कंपनीला काही अटी व शर्ती दिल्या होत्या. त्यांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँकेने कंपनीला याचा खुलासा विचारला तसेच याची स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली. या दरम्यान कंपनीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचे दिसून आले. मात्र, कंपनीने जे ८५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते त्याचा संबंधित प्रकल्पासाठी विनियोग केल्याचे प्रमाणपत्र कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट मे. आर. देवराजन यांनी दिले होते. यानंतर बँकेने स्वतंत्रपणे कंपनीचे फोरेन्सिक ऑडिट केले. त्या ऑडिटमध्ये धक्कादायक गोष्टी बँकेच्या निदर्शनास आल्या. कंपनीला कर्जापोटी जी रक्कम मिळाली होती त्याचा वापर कंपनीने संबंधित प्रकल्पासाठी केलाच नाही. ते पैसे कंपनीने अन्य बँकेचे कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचे दिसून आले. परिणामी, बँकेला एकूण २६० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
सीएवरही गुन्हा दाखल
या लेखी तक्रारीच्या आधारे मुंबईत सीबीआयने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक पूंज, आलोक पूंज यांच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे, कंपनीच्या व्यवहारांसंबंधी खोटे प्रमाणपत्र जारी केल्याप्रकरणी सीबीआयने कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट मे.आर.देवराजन यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला.