सिंगापूरहून मुंबई विमानतळावर २६० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 12:00 AM2021-04-27T00:00:12+5:302021-04-27T00:00:34+5:30
राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे भारतात वैद्यकीय साहित्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे मित्रराष्ट्रांनी मदतीचा हात पुढे केला आहे. रविवारी मध्यरात्री सिंगापूरहून मुंबईत वैद्यकीय मदत दाखल झाली.एअर इंडियाच्या विमानांच्या साहाय्याने मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या या वैद्यकीय मदतीत २६० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ५०० बीपीएपी (बायलेव्हल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) या उपकरणांचा समावेश आहे.
राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. सिंगापूरहून दाखल झालेल्या या नव्या यंत्रांच्या साहाय्याने रुग्णांची ऑक्सिजन पातळी आणि श्वसनक्रिया सुरू ठेवून त्यांच्यावर उपचार करणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले. या मदतीमुळे कोरोनाविरोधी लढ्याला बळ मिळेल, अशी आशा हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी व्यक्त केली. कोरोना विरोधातील लढाईत हवाई वाहतूक क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. वैद्यकीय सुविधांचा तुटवडा असलेल्या राज्यांत हवाई वाहतुकीद्वारे जलद सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे पुरी यांनी सांगितले.