मुंबई : इमारतींचे बांधकाम पूर्ण करून वापर परवानाही (ओसी) मिळाला आहे मात्र, खरेदीसाठी ग्राहकच नसल्याने मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) तब्बल २६ हजार कोटी रूपये किंमतीची १९ हजार २०० घरे धूळखात पडून आहेत. देशातील सात प्रमुख शहरांमध्ये अशी ७८ हजार घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत असून त्यांची किंमत तब्बल ६६ हजार ९५० कोटी इतकी असल्याची माहिती हाती आली आहे.
अँनराँक या संशोधन आणि सल्लागार संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. पुण्यातील घरांची संख्या १५ हजारांपेक्षा जास्त आहे. तर दिल्ली – एनसीआर ( १५,६००) बंगळुरू (१०,१००) तर हैद्राबाद (१,८७०) घरांची विक्री होऊ शकलेली नाही. मार्च, २०२० अखेरीस या सात शहरांमध्ये तब्बल ६ लाख ६६ हजार घरांचे बांधकाम सुरू आहे. मुंबई महानगर क्षेत्रात अशा घरांची संख्या सुमारे २ लाख १३ हजार तर पुण्यात ९३ हजार ३०० इतकी प्रचंड आहे. लाँकडाऊनमुळे ते काम थांबले असले तरी येत्या काही महिन्यांत त्यापैकी बहुतांश इमारतींचे काम पूर्ण होईल. आर्थिक मंदीच्या काळात ही घरे विकण्याचे मोठे आव्हान विकासकांसमोर असेल.
-----------------------------------
गृह खरेदीसाठी चांगली संधी ?
कोरोना संकटामुळे बांधकाम व्यवसायात आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे बांधकाम सुरू असलेले प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होतील याची शाश्वती कुणालाही देता येत नाही. त्या घरांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी ग्राहक निवासासाठी तयार असलेल्या घरांना प्राधान्य देतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली तयार घरे खरेदी करण्याकडे कल वाढेल. त्यातच बँकांनी गृह कर्जांचे व्याज दर कमी करण्यास सुरूवात केली आहे. किंमतीत काही प्रमाणात सवलती देऊन विकासकही या घरांची विक्री करण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे पहिल्यांदा गृह खरेदी करणा-यांसाठी ही चांगली संधी असल्याचे मत अँनराँकचे अध्यक्ष अरूण पुरी यांनी व्यक्त केले आहे.