२६/११ च्या हल्ल्याची माहिती देणाऱ्यास मिळणार ३५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 05:46 AM2018-11-27T05:46:47+5:302018-11-27T05:47:01+5:30
हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण; अमेरिकेने जाहीर केले बक्षीस
वॉशिंग्टन : मुंबईवर २००८ साली झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला सोमवारी १0 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने त्यात बळी पडलेल्यांना देशभरात आदरांजली वाहण्यात आली. २६/११चे सूत्रधार तसेच हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास अमेरिकेने ३५ कोटी रुपयांचे (५० लाख डॉलर)चे बक्षीस जाहीर केले. या घातपाती कृत्यातील दोषींविरोधात कठोर कारवाई करा, असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे.
या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते. त्यात मुंबईतील अनेक पोलीस अधिकारी तसेच सहा अमेरिकी नागरिकांचा समावेश होता. पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबाचे दहशतवादी भारतात समुद्रमार्गे घुसखोरी करून मुंबईपर्यंत पोहोचले होते. त्यातील अजमल कसाब हा दहशतवादी जिवंत पकडला गेला. त्याला फाशी देण्यात आली.
हा हल्ला अमानुषतेचा कळस होता. त्यातील सूत्रधार व या कटात सहभागी असलेल्यांवर पाकिस्तानने कठोर कारवाई करावी, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी दिला आहे. या भीषण कृत्यामागील सूत्रधारांना कडक शिक्षा झाली पाहिजे असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. राज्यघटना दिनानिमित्त दिल्लीतील समारंभात ते बोलत होते.
मुंबईवरील हल्ल्याने आमच्या जिव्हारी केलेली जखम अजूनही तशीच भळभळती आहे, असे या हल्ल्यात वाचलेल्या मोशे या ज्यू मुलाचे आजोबा रब्बी शिमॉन रोसेनबर्ग यांनी म्हटले आहे.