मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण झाली. या दहशतवाद्यांपैकी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले होते. हातात काहीही शस्त्र नसूनही शहीद तुकाराम ओंबळे यांनी मिठीत घट्ट पकडून ठेवले होते. कसाब हा पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी मोठा पुरावा म्हणून भारताच्या हाती लागला होता. टाटा ग्रुपच्या ताज हॉटेलवरही मोठा हल्ला झाला होता. यावर रतन टाटा यांनी भावूक पोस्ट केली आहे.
मुंबईवर हल्ला होताच मुंबई पोलिसांनी एकेका दहशतवाद्याला शोधून ठार केले होते. टाटा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर लिहिले की, ज्या ज्या लोकांनी शत्रूवर विजय मिळविण्यासाठी मदत केली, त्यांचे बलिदान आम्ही नेहमी आठवणींत ठेवू. तसेच त्यांनी मुंबईकरांच्या धैर्याचेही कौतूक केले आहे. या एकतेला सांभाळून ठेवण्याची जबाबदारी असल्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
आजपासून 12 वर्षांपूर्वी जो विनाश झाला, तो कधीही विसरता येणार नाही. मात्र, त्यापेक्षाही लक्षात राहाणारे आहेत ते त्या दिवशी दहशतवाद संपविण्यासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र आलेले मुंबईचे लोक. आम्ही ज्यांना गमावले, ज्यांनी शत्रूवर विजय मिळविण्यासाठी बलिदान दिले, आज आम्ही जरूर त्यांच्यासाठी दु:ख करू शकतो. मात्र, आम्हाला त्या एकतेला, दयाळुपणाला आणि संवेदनशीलतेलाही मानायला हवे. तसेच ती कायम ठेवायला हवी. मला वाटते की पुढील संकटांत ती आणखी वाढेल, असे टाटा म्हणाले.
राज्य पोलीस मुख्यालयाच्या भिंतीतून उलगडणार शहिदांचा इतिहास२६/११ हल्ल्याच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्ताने राज्य पोलीस दल मुख्यालयातील भिंतीवर उभारलेले स्मारक सर्वांसाठी खुले होणार आहे. यात महाराष्ट्रातील शहीद झालेल्या ८०० अधिकारी आणि अंमलदारांचा इतिहास उलगडेल. यात १७ शहिदांवरील लघुपटांचाही समावेश आहे.गेल्या सहा दशकांत दहशतवाद, नक्षलवाद, संघटित गुन्हेगारी, बचावकार्य, कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करताना ७९७ अधिकारी, अंमलदार शहीद झाले आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहता यावी आणि त्यांच्या पराक्रमाची माहिती नागरिकांना मिळावी या उद्देशाने हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती आणि लघुपटांद्वारे सर्वोच्च बलिदान देताना पोलिसांची झुंज, शौर्य आणि नेमकी परिस्थिती याचा प्रसंग उभा करण्यात आला आहे. या स्मारकाचे गुरुवारी उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर हे स्मारक सर्वांसाठी खुले होईल.
१७ शहीद अधिकारी, अंमलदारांच्या कहाण्या निवडून त्यावर लघुपट तयार करण्यात आले. जेथे हे पोलीस शहीद झाले तेथेच त्यांच्या कुटुंबीयांच्या मुलाखतीचे चित्रीकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे यातून पोलिसांचे कार्य, त्यांची जबाबदारी, धडपड, बलिदान आणि कुटुंबीयांची भावना नागरिकांपर्यंत पोहोचू शकेल.