Join us

26/11 हल्ला : कसाबविरोधात साक्ष दिली म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 3:16 PM

देविका नटवरलाल रोटवान तेव्हा अवघ्या नऊ वर्षांची होती. इतक्या लहान वयातही तिनं कसाबविरोधात साक्ष दिली. तिचं कौतुक करायचं सोडून...

मुंबई - 26/11च्या खटल्यात  दहशतवादी अजमल कसाबविरोधात साक्ष दिली म्हणून राजस्थानच्या रोटवान कुटुंबाला चक्क वाळीत टाकलं आहे. हल्ला झाला तेव्हा हे कुटुंब सीएसएमटी स्थानकावर होतं. देविका नटवरलाल रोटवान तेव्हा अवघ्या नऊ वर्षांची होती. इतक्या लहान वयातही तिनं कसाबविरोधात साक्ष दिली. तिचं कौतुक करायचं सोडून तिला आणि तिच्या कुटुंबावर संपूर्ण परिवार आणि गावानं बहिष्कार टाकला. पण तुमच्या मुलीच्या साक्षीमुळे संपूर्ण गाव धोक्यात आलंय, पाकिस्तानमधून दहशतवादी येतील आणि आम्हाला मारून टाकतील, असा भ्याड आणि मूर्खपणाचा विचार गावकऱ्यांच्या मनात आला आणि त्यांनी कुटुंबाला वाळीत टाकलं. त्यांच्याशी कुणीच व्यवहार करेना. नटवरलालना काम मिळेना. शेवटी त्यांना गाशा गुंडाळून मुंबईत स्थायिक व्हावं लागलं.

आज ती 18 वर्षांची झाली आहे. ही कहाणी आहे या मुलीच्‍या संघर्षाची आणि तिच्‍या हिमतीची. त्‍याचसोबत सरकारी दाव्‍यांचा फोलपणा आणि लोकांच्‍या असंवेदनशीलतेचा चेहराही यानिमित्‍ताने समोर आला आहे. दहशतवादी हल्‍ल्‍यामध्‍ये गोळी लागल्‍यामुळे देविकाची 6 वेळेस शस्‍त्रक्रिया करावी लागली आहे. तसेच मागील एका वर्षापासून देविका टीबीने पिडीत आहे. तरीदेखील कुणीही या कुटुंबाच्‍या मदतीला आले नाही. 

माध्यमांशी बोलताना देविकाच्‍या वडीलांनी सांगितले की, 'हॉस्पिटलमध्‍ये भरती होतो, तेव्‍हा काँग्रेसचे अनेक मोठे नेते भेटण्‍यासाठी आले होते. त्‍यांनी आम्‍हाला आश्‍वासन दिले होते की, सरकारतर्फे त्‍यांची राहण्‍याची सोय केली जाईल. जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून एक अर्जही भरुन घेण्‍यात आला होता. तो अर्ज घेऊन मी जेव्‍हा जिल्‍हाधिका-यांना भेटायला गेलो तेव्‍हा ते म्‍हणाले, मागील जिल्‍हाधिका-यांनी तुम्‍हाला काय सांगितले, आम्‍हाला माहिती नाही. नटवरलाल सांगतात की, याप्रकरणी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशीही अनेकदा भेट घेतली आहे. मात्र काही फायदा झाला नाही. घटनेनंतर सरकारी मदतीच्‍या नावाखाली आम्‍हाला मात्र 3 लाख 25 हजार रुपये मिळाले. नटवरलाल यांनी सांगितले की, स्‍पेशल कोर्टाने सरकारला परिवारच्‍या राहण्‍याची आणि मुलीच्‍या शिक्षणाची सोय करण्‍याचे सांगितले होते. मात्र अधिकारी सांगतात की, आम्‍हाला कोर्टाच्‍या आदेशाची प्रत दाखवा. मात्र कोर्टाने हे मौखिक सांगितले होते. त्‍याची प्रत कुठून आणू.