मुंबई : महाराष्ट्रातील वातावरणात सध्या अराजकता माजली आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि अयोध्या येथील राम मंदिर या विषयांवर झालेल्या निर्णयामुळे गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. यासह आता २६ नोव्हेंबर २००८ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या घटनेला ११ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर उपनगरीय रेल्वे स्थानकांवर २ हजार १०० सुरक्षा जवानांचा पहारा ठेवण्यात येत आहे.२६/११ ला अतिरेक्यांनी सीएसएमटी स्थानकासह इतर ठिकाणी हल्ला केला. या दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मार्गावर ६०० तर पश्चिम रेल्वे मार्गावर १ हजार ५०० रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात केले आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, बोरीवली या स्थानकांवर कडक पहारा ठेवण्यात आला आहे. यासह इतर संवेदनशील स्थानकांवर पोलिसांची वारंवार गस्त सुरू आहे. रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड यांच्याद्वारे सुरक्षा वाढविण्यात आली आहे. यासह श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक, दंगल नियंत्रण पथक यांच्याद्वारे सुरक्षेला बळकटी देण्यात आली आहे. प्रवाशांनी कोणत्याही अफवेला बळी न पडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
२६/११च्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 2:14 AM