मुंबई : मुंबईवरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याला एक दशकाचा अवधी पूर्ण होत असताना राज्य सरकारकडून पोलीस दलाच्या सक्षमीकरणाचा गाजावाजा करण्यात येत आहे. वस्तुस्थिती मात्र फार वेगळी आहे. हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील विविध महत्त्वाच्या १८० ठिकाणी उभारण्यात आलेल्या बंकरची अवस्था अंत्यत दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी हे बंकर भिकारी व गर्दुल्ल्यांचे अड्डे बनले आहेत.
हे बंकर असलेल्या ठिकाणी पोलीस क्वचितच आढळून येतात. त्याशिवाय तेथील मेटल डिटेक्टर्स नादुरुस्त अवस्थेत धूळ खात पडले आहेत. तर वाळू भरलेल्या गोण्या फाटून जीर्ण झाल्या आहेत. ‘२६/११’नंतर मुंबईची सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली होती. त्यामुळे विविध उपाययोजनांबरोबरच तातडीची सुरक्षा व्यवस्था म्हणून सर्व महत्त्वाच्या, वर्दळीच्या ठिकाणी नजर ठेवण्यासाठी बंकर उभारण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यानुसार मुंबई शहर व उपनगरातील विविध महत्त्वाची कार्यालये, रेल्वे, बसस्थानके, धार्मिक स्थळे व संवेदनशील ठिकाणी तात्पुरती पोलीस चौकी तसेच बंकर बनविण्यात आले होते. यात सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांचा समावेश होता. या ठिकाणी सुमारे पाच फुटांपर्यंत गोण्या रचून २४ तास सशस्त्र पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमला जात होता. त्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करणाºया नागरिकांवरही एक प्रकारे वचक बसला होता. शिवाय समाजकंटक, रोड रोमियोंकडून होणारे गैरकृत्य, गुंडशाहीलाही लगाम बसला होता.मेटल डिटेक्टर्सही नादुरुस्तसुरुवातीला काही वर्षे त्या ठिकाणी काटेकोरपणे बंदोबस्त नेमला जात होता. मात्र, लाखो रुपये खर्चून उभारलेल्या या बंकरपैकी काही बंकर हे कालांतराने कालबाह्य ठरविले आहेत.त्या ठिकाणाहून पोलीस हटविण्यात आले असले, तरी तेथील गोण्या तशाच पडून आहेत. मेटल डिटेक्टर्सही नादुरुस्त असून त्यांना गंज चढला आहे. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य सुरक्षेची साधने कार्यान्वित करण्यात आल्याची सबब अधिकाºयांकडून सांगितली जाते.प्रत्यक्षात या बंकरना कोणीच वाली नसल्याने ते भिकारी व गर्दुल्ल्यांचे आश्रयस्थान बनले आहेत. दिवस, रात्र ते या ठिकाणी थांबून असतात. त्यांना तेथून हटविण्याची तसदी पोलिसांकडून घेतली जात नाही.