मुंबई - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात शहिदांना आदरांजली अर्पण केली जात असताना राज्य सरकारला मात्र त्याचा विसर पडल्याचे दिसून आले. सोमवारी (26 नोव्हेंबर) सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सरकारकडून मुंबई हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्याचा ठराव मांडला जाईल, असे अपेक्षित होते. मात्र, सरकारने तसा ठराव न मांडल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहाच्या अध्यक्षांकडे तशी मागणी केली.
या हल्ल्यामध्ये सुरक्षा यंत्रणांचे अनेक अधिकारी व जवान शहीद झाले. अनेक निरपराध नागरिकांचाही बळी गेला. त्यामुळे विधानसभा सुरू असताना आदरांजली अर्पण करून त्यांचे स्मरण केले गेले पाहिजे, असेही विखे पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही विखे पाटील यांच्या मागणीला अनुमोदन दिले. त्यानंतर अध्यक्षांनी सभागृहाची भावना लक्षात घेता मुंबई हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला.