मुंबई - मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 10 वर्षांपूर्वी समुद्रमार्गे 10 दहशवादी मुंबईत घुसले होते. या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत मुंबापुरीला हादरवले होते. याच दहशतवाद्यांमध्ये अजमल कसाबचाही समावेश होता. या हल्ल्यातील एकमेव दहशतवादी जो जिवंत मुंबई पोलिसांच्या हाती लागला होता. पण बचावल्याबाबत त्याला अजिबात आनंद झाला नव्हता. 26/11 दहशतवादी हल्ल्याचा तपास करणारे पोलीस अधिकारी निनाद सावंत यांनी याबाबत सांगितले की, क्राईम ब्रांचचं पथक जेव्हा कारागृहाच्या कोठडीत विचारपूस करण्यासाठी गेलं होतं, तेव्हा कसाबनं त्याच्याकडे अक्षरशः मृत्यूची भीक मागितली होती. ''मला लॉकअपमध्येच मारुन टाका, मला जिवंत राहण्याची इच्छा नाही'', असे त्यानं तपास अधिकाऱ्यांना म्हटले होते.
(26/11 Mumbai Attacks: मुंबईसह राज्यात कडेकोट बंदोबस्त, गर्दीच्या ठिकाणी पहारा)
त्यावेळेस निनाद सावंत क्राईम ब्रांचच्या युनिट तीनसोबत कार्यरत होते. 26/11हल्ल्यावेळी दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचे मोठे योगदान आहे. कसाब गाडीत बसलेला असताना त्याला बाहेर काढण्यासाठी ओंबळे यांनी झडप घातली. त्यावेळी कसाबनं त्यांच्यावर एके-47मधून गोळीबार केला. यात तुकाराम ओंबळे शहीद झाले.
निनाद सावंत यांनी असंही सांगितले की, क्राईम ब्रांचकडून कसाबला ताज, लिओपोल्ड कॅफे, नरीमन हाऊस, सीएसएमटी परिसरात ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे फोटो दाखवले. हे फोटो पाहून कसाब बिथरला. हे सर्व मारले गेले तर मी का जिवंत आहे?, असा प्रश्न त्याला पडला. हे फोटो पाहूनच त्यानं म्हटले होत की, 'मलाही मारुन टाका. मला जिवंत राहायचं नाही'. दरम्यान, कसाबकडूनचा ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आणि माहिती तपास पथकाला मिळाली.