मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास आज दहा वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त मुंबईसह पूर्ण राज्यभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व प्रमुख स्थळे, गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता संशयास्पद व्यक्ती, वस्तूबाबत तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर व मुंबईचे आयुक्त सुबोध जायस्वाल यांनी केले आहे.
‘२६/११’च्या घटनेला दहा वर्षे पूर्ण होत असल्याने कोणतेही घातपाती कृत्य होऊ नये, यासाठी मुंबईसह पूर्ण राज्याला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री समुद्रामार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये अधिकाऱ्यांसह शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते.
या घटनेनंतर आधुनिक शस्त्रसामग्रीसह पोलिसांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र तरीही मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट अद्यापही कायम आहे. ‘कसूर सोडू नका’ सर्व महत्त्वाची रेल्वे स्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सुरक्षेबाबत कोणतीही कमतरता न ठेवण्याची सूचना अधिका-यांनी सर्व पोलीस घटकप्रमुखांना दिली आहे.