२६/११ मुंबई हल्ला; पाकिस्तानच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 07:07 AM2019-02-04T07:07:09+5:302019-02-04T07:07:12+5:30
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने पाकिस्तानी लष्कराचे दोन अधिकारी मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इकबाल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.
मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानेपाकिस्तानी लष्कराचे दोन अधिकारी मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इकबाल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. मेजर पाशा पाकिस्तानी लष्करामधून निवृत्त झाला आहे, तर मेजर इकबाल अद्यापही आयएसआयच्या सेवेत आहे, असा सरकारी वकिलांचा दावा आहे. २६/११ हल्ल्याप्रकरणी दाखल दोषारोपपत्रात मेजर पाशा आणि मेजर इकबाल यांना मुंबई पोलिसांनी फरारी आरोपी म्हणून म्हटले आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यासंबंधी दाखल केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर करत, या दोघांच्याही विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. २६/११च्या खटल्यातील आरोपी व एलईटीचा सदस्य सय्यद झबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याच्यावरील खटल्याच्या सुनावणीत निकम यांनी वरील अर्ज न्यायालयात सादर केला. या हल्ल्याचा कट उघडकीस आणण्यासाठी हेडलीची साक्ष घेण्यात आली होती. या साक्षीमध्ये हेडलीने मेजर पाशा आणि मेजर इकबाल यांचाही हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याचे न्यायालयाला सांगितले होते, असे निकम यांनी सांगितले.
हेडली सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. तो तेथे कारावासाची शिक्षा भोगत आहे. २६/११च्या खटल्यात तो माफीचा साक्षीदार झाला. त्याने २०१६ मध्ये मुंबई न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदविली होती. दोन व्यक्तींविरुद्ध (पाशा आणि रहमान) अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी सरकारी वकिलांनी केलेला अर्ज मंजूर करण्यात येत आहे. या दोघांनाही फरारी आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि माफीचा साक्षीदार हेडली यानेही साक्षीत त्यांचे नाव घेतले आहे. त्यामुळे या दोघांवरही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येत आहे, असे न्यायालयाने म्हटले. हेडली याने त्याच्या साक्षीत म्हटले आहे की, दहशतवादी हल्ल्यासाठी मुंबईतील ठिकाणे निवडण्यास घेतलेल्या बैठकीत हे दोन्ही अधिकारी उपस्थित होते.
रेकी करण्यासाठी हेडलीला दिले पैसे!
निकम यांनी न्यायालयाला सांगितले की, पाशा आणि इकबाल विरोधात केवळ हेडलीची साक्षच उपलब्ध नाही, तर त्याचे समर्थन करणारे अनेक पुरावे पोलिसांकडे उपलब्ध आहेत. हेडलीने डिसेंबर, २००६ मध्ये मुंबईला भेट दिली होती. त्याने इकबालला हॉटेल ताजबाबत माहिती दिली होती आणि त्याचे फोटो व व्हिडीओही दिले होते. रेकी करण्यासाठी मेजर इकबाल याने हेडलीला २५ हजार डॉलरही दिले होते, तसेच मेजर पाशाने ८० हजार रुपये दिले होते, असे हेडलीने साक्षीत सांगितले आहे. २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमधून दहा अतिरेकी पाठविण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज, हॉटेल ट्रायडेंट, कॅफे लिओपोल्ड आणि छाबड हाउस या ठिकाणी हल्ला करण्यात आला. नऊ अतिरेक्यांचा जागीच खात्मा करण्यात आला, तर कसाबवर खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.