प्रवाशांची वाढती संख्या, अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकल, मेल-एक्स्प्रेसमधून लाखो प्रवासी प्रवास करीत आहेत. अशात २६/११ च्या हल्ल्यानंतरही एकात्मिक सुरक्षा यंत्रणा, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), रेल्वे सुरक्षा बल कमांडो पथक तैनात असले, तरी सुरक्षेचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही.
रेल्वेवरील ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर, २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षेबाबत रेल्वे यंत्रणा कमी पडल्याचे दिसून आले. त्यानंतर सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने दादर, सीएसएमटी, कुर्ला, कुर्ला टर्मिनस, कल्याण, ठाणे या प्रमुख स्थानकांना विशेष सुरक्षा दिली. त्यात प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर, बॉम्बशोधक व विनाशक यंत्रणा पुरविण्यात आली.
मात्र प्रवाशांची वाढती संख्या आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे रेल्वेवरील संकट कायम आहे. रेल्वे पोलीस, आरपीएफमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. महिलांच्या डब्यात सुरक्षा देण्यासह अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर असल्याने बळ अपुरे पडते. त्याचा परिणाम सुरक्षेवरही होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर रेल्वे पोलीस शक्य तितके कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.
* प्रत्येक फलाटावर लक्ष देणे अशक्य
स्थानकातील प्रत्येक फलाटावर लक्ष देणे शक्य नाही. त्यात लोकलमध्ये फेरीवाल्यांची भर पडत आहे. अशात कोरोनाच्या काळातही विविध वस्तूंच्या विक्रीसाठी महिलांबरोबर पुरुषही महिला डब्यात दिसत आहेत. त्यात रेल्वे पोलीस आणि मुंबई पोलिसांमध्ये समन्वय कमी असल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्याचा परिणाम काहीसा तपासावरही होताना दिसतो. शासनाने यंत्रणेसाठी आणखी उपाययोजना करण्याबरोबरच मनुष्यबळाचा तुटवडा भरून काढणे गरजेचे असल्याचे मत या अधिकाऱ्यांनी मांडले.
.......