मुंबई : जानेवारी ते आॅक्टोबरदरम्यान राज्यभरात स्वाइन फ्लूचे तब्बल २६६ बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. याशिवाय, ४४६ रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.स्वाइन फ्लूचा विषाणू हा अतिसूक्ष्मजीव आहे. तो श्वसनप्रक्रियेवर परिणाम करतो. मात्र या आजाराचे निदान उशिरा झाल्यास धोका वाढतो. रोगप्रतिकारक्षमता कमी असलेल्या रुग्णांना याचा धोका जास्त असतो. मधुमेही, लहान मुले, वृद्ध, गर्भवती यांनी आपल्या प्रकृतीबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे.याविषयी, राज्याचे वैद्यकीय सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, सध्या राज्यात २ हजार १४९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ४४३ रुग्णांना उपचार करून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. राज्यात २०१५पासून अति जोखमीच्या व्यक्तींना मोफत व ऐच्छिक लसीकरण सुरू केले आहे. गरोदर माता, मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि आरोग्य कर्मचारी या तीन गटांतील व्यक्तींना ही लस मोफत पुरवली जाते. गरोदर मातांना नाकाने द्यावयाची लस देता येत नाही. त्यामुळे इंजेक्शनने लस दिली जाते. आपल्याकडे स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण वर्षभरात मुख्यत्वे हिवाळा आणि पावसाळ्यात आढळतात. लस घेतल्यानंतर फ्लूविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान तीन आठवड्यांचा काळ लागतो.>ही आहेत लक्षणे...सर्दी, खोकला, वारंवार शिंका, घशात खवखव, थंडी वाजून ताप, अंगदुखी ही ‘स्वाइन फ्लू’ची लक्षणे आहेत. या रुग्णाने त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होतो. याची बाधा इतरांना होऊ नये म्हणून रुग्णाने एका खोलीतच आराम करणे, गर्दीत जाणे टाळणे, इतरांच्या संपर्कात न येणे, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. हा रुग्ण केवळ स्वाइन फ्लूने दगावत नसून, फुप्फुसावर होणारा घात व न्यूमोनियामुळे त्याचा मृत्यू होतो.
राज्यात गेल्या नऊ महिन्यांत स्वाइन फ्लूचे २६६ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 5:45 AM