छाननीमध्ये २७ अर्ज बाद

By Admin | Published: April 9, 2015 04:58 AM2015-04-09T04:58:52+5:302015-04-09T04:58:52+5:30

पालिका निवडणुकीसाठी दाखल केलेल्या ९१४ अर्जांची छाननी करण्यात आली असून, २७ अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये अनेक डमी अर्जांचा समावेश असून

27 applications after scrutiny | छाननीमध्ये २७ अर्ज बाद

छाननीमध्ये २७ अर्ज बाद

googlenewsNext

नवी मुंबई : पालिका निवडणुकीसाठी दाखल केलेल्या ९१४ अर्जांची छाननी करण्यात आली असून, २७ अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये अनेक डमी अर्जांचा समावेश असून, सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या एका महिला उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने पक्षाला मोठा झटका बसला आहे. ८८७ उमेदवार रिंगणात असून १० एप्रिलपर्यंत किती जण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँगे्रसच्या बाद झालेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग ३६ च्या उमेदवार रूक्सार जमीर कुरेशी यांचा समावेश आहे. तीन अपत्ये असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसला धक्का बसला आहे. नेरूळ प्रभाग ९० मध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या तिघांनी अर्ज दाखल केले होते. यामधील रूचिता रमेश कर्पे यांना उमेदवारी निश्चित झाली होती. परंतु पक्षातीलच काही नेत्यांनी त्यांचा अर्ज बाद केला असून जवेरी बिपीन बन्सीलाल यांना तिकीट देण्यात आले आहे. या जागेवरून पक्षाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. उमेदवार ठरवतानाही या परिसरात राष्ट्रवादीच्या दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. तुर्भे स्टोअरमधील राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार सुरेश कुलकर्णी व कोपरखैरणेतील केशव म्हात्रे यांच्या विरोधातील उमेदवारांनीही आक्षेप घेतले होते. परंतु त्यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
छाननीमध्ये २७ अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये अनेक उमेदवारांनी दोन अर्ज भरले असल्यामुळे त्यांचा डमी अर्ज बाद झाला आहे. बाद झालेल्या अर्जांमध्ये अपक्ष उमेदवारांचा भरणा जास्त असून काँगे्रस, भाजपा व शिवसेनेच्या डमी उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या जे. डी. सुतार, शिवसेनेच्या सुनिता मांडवे, भाजपाचे काशिनाथ पाटील यांनी पक्षासह डमी अर्जही भरले होते. ते अर्ज बाद झाले असून त्यांचे अधिकृत अर्ज वैध ठरले आहेत.
दरम्यान, अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ८८७ जण निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये शिवसेना व भाजपाच्या बंडखोर उमेदवारांची संख्याही मोठी आहे. अर्ज मागे घेण्यासाठी १० एप्रिलपर्यंतची मुदत आहे. यामुळे बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्व पक्षाचे नेते प्रयत्न करणार आहेत. अनेक बंडखोरांनी कोणत्याही स्थितीमध्ये माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: 27 applications after scrutiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.