मुंबई : घरकाम करणाऱ्या नोकराने २७ लाखांचा ऐवज घेऊन पसार झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात घडला होता. जवळपास ८ दिवस सलग तपास करत, त्याच्या मुसक्या झारखंडमधून आवळण्यात वांद्रे पोलिसांना मंगळवारी यश आले.वांद्रे माउंटमेरी परिसरात असलेल्या टॉवरमध्ये नादिर ईराणी राहतात. त्यांच्याकडे उदय रामेश्वरप्रसाद यादव हा घरकाम करत होता. वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्चला ईराणी कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधत यादवने त्यांच्या घरातील पैसे आणि दागिने असा २६ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. २३ मार्चला ईराणी कुटुंबीय घरी परतले, तेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर, या प्रकरणी त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यादवने कामावर येणे बंद केल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, यादव हा झारखंडला लपल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार, आमचे एक पथक झारखंडला दाखल झाले. त्या ठिकाणी गिरडी जिल्ह्यातील एका गावात यादव लपून बसल्याचे समजले. त्यानुसार, जवळपास आठ दिवस सतत आमचे पथक यादववर लक्ष ठेवून होते, असे ठाकरे यांनी सांगितले. अखेर आमच्या पथकाने यादवला अटक करून मुंबईत आणले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचेही त्यांनी नमूद केले. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात यादवने हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याने असा काही प्रकार अन्य ठिकाणी केलाय का, याचा तपास करीत आहोत, असे ठाकरे म्हणाले.
नोकराने लांबविले २७ लाख, झारखंडमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 2:33 AM