मुंबई पालिका : ‘ब्रिटिश कोरोना’च्या अहवालाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रिटनवरून २१ डिसेंबरपासून तसेच गेल्या महिन्याभरात मुंबईत आलेल्या प्रवाशांपैकी आतापर्यंत १,४५० लोकांची चाचणी महापालिकेने केली आहे. यापैकी आतापर्यंत २७ प्रवासी बाधित असल्याचे समोर आले आहे. मात्र १० जणांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या सर्वांचे नमुने ‘जिनोम सिक्वेन्स’साठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पुनर्तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर २०२० नंतर मुंबईत आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी पालिकेचे वैद्यकीय पथक करीत आहे. राज्य सरकारडून मिळालेल्या यादीनुसार २,६०० प्रवाशांपैकी १,४५० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २७ प्रवासी बाधित असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या रुग्णांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणार आहे. हा कालावधी पूर्ण केल्यानंतर २४ तासांच्या अंतराने दोन कोरोना चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे.
* मुंबईत १ डिसेंबरपासून आतापर्यंत ५० हजार प्रवासी विमानमार्गे आले आहेत. परदेशातून ११ हजार २०० तर देशांतर्गत प्रवासात ३९ हजार ५०० प्रवासी आले. या सर्व प्रवाशांची पालिकेच्या माध्यमातून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
* ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने पुन्हा तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठविण्यात येत आहेत.
युरोप मध्य पूर्व आणि दक्षिण आफ्रिका येथून ३० डिसेंबर रोजी मुंबईत आलेले प्रवासी
एकूण विमाने दाखल - १६
प्रवासी आले - १,२११
मुंबईत क्वारंटाइन - ५०६
अन्य राज्यांत रवानगी - ६५६
...............