मुंबई : व्यसनमुक्तीसाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असतानाही एका खासगी रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या पालिका शाळांतील २७ टक्के विद्यार्थी धूम्रपानाच्या आहारी गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शाळेच्या ठरावीक परिघात या पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे, मात्र असे असूनही पालिका शाळांतील विद्यार्थी सिगारेट ओढत असल्याने त्यांना कर्करोगाचा धोका संभावतो, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.यासंदर्भात रुग्णालयाचे कम्युनिटी हेल्थ सर्व्हिस अँड रिसर्च विभागाचे प्रमुख व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. क्रांती रायमाने यांनी सांगितले की, तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण लहान मुलांमध्ये वाढताना दिसते.या पार्श्वभूमीवर मुंबईतील पालिका शाळांमध्ये जाऊन मुलांचे सर्वेक्षण करून तंबाखूसंदर्भात जागरूकता निर्माण करण्याचे ठरविले. या सर्वेक्षणाचा अहवाल सरकारसमोर सादर करून व्यसनाधीन मुलांना परावृत्त करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येतील, याविषयी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.या सर्वेक्षणात पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. ज्यात प्राथमिक स्तरावर २७ टक्के मुले व्यसन करत असल्याचे आढळून आले. पण अजूनही हे सर्वेक्षण संपलेले नाही. अचूक आकडेवारी कळायला काही दिवस लागतील, असेही डॉ. रायमाने म्हणाले. कर्करुग्णांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम केले जाते.
धूम्रपानाचे २७ टक्के विद्यार्थ्यांना व्यसन, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 4:50 AM