राज्यात स्वाइन फ्लूचे २७ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:50 AM2019-03-04T05:50:11+5:302019-03-04T05:50:21+5:30
राज्यातील थंडी ओसरली असली, तरीही अजूनही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत नाही.
मुंबई : राज्यातील थंडी ओसरली असली, तरीही अजूनही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत नाही. गेल्या दोन महिन्यांत राज्यभरात स्वाइन फ्लूमुळे २७ बळी गेले आहेत. त्यात मुंबईतील १७ जणांचा समावेश आहे. स्वाइन फ्लूवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर केला जात असल्याची माहिती, आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या वर्षी राज्यात एकूण ४६१ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता, तर २ हजार ५९३ रुग्ण आढळले होते. यंदा देशभरात स्वाइन फ्लूची दहशत कायम असून, गेल्या दोन महिन्यांत राजस्थानमध्ये १३७ बळी गेले आहेत, तर ३ हजार ९६४ रुग्ण आढळले आहेत. राजस्थाननंतर गुजरातमध्ये स्वाइन फ्लूचे ८८ बळी गेले आहेत, तर २ हजार ७२६ रुग्ण आढळले आहेत.
स्वाइन फ्लूचा आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाद्वारे सतर्कता बाळगली जात आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आले असून, तेथे आयसीयू व व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे ४ लाखांहून रुग्ण तपासण्यात आले आहेत, अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली.