राज चिंचणकर , मुंबईमराठी रंगभूमीवर एक काळ गाजलेले ‘षड्यंत्र’ हे नाटक तब्बल २७ वर्षांनी रंगभूमीवर पुन्हा एन्ट्री घेण्यास सज्ज झाले आहे. आपल्या रहस्यमय बाजाने हे नाटक त्या काळी नावारूपाला आले होते आणि त्याने उदंड रसिकप्रियता मिळवली होती. विशेष म्हणजे, त्या वेळी यात भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर नव्याने येणाऱ्या या नाटकात, त्यांनी गाजवलेली भूमिका पुन्हा रंगवत आहेत.नाटककार सुरेश जयराम यांचे हे नाटक १९९०मध्ये रंगभूमीवर आले होते. ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. अभिनेते चंदू पारखी, रमेश भाटकर, गिरीश ओक, सविता प्रभुणे, प्रमोदिनी कदम, सुजाता कानगो, संदीप मेहता आदी कलाकारांनी या नाटकात धुमाकूळ घातला होता. हेच ‘षड्यंत्र’ आता नव्या नटसंचात रंगभूमीवर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, उस्मानाबाद येथील ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे हे या नाटकाचे दिग्दर्शन करीत असून, हीसुद्धा या नाटकाची खासियत आहे. रमेश भाटकर यांच्यासह अभिनेत्री सिया पाटील, सुचित जाधव, सुदेश म्हशीलकर आदी कलावंत यात भूमिका साकारत आहेत.
२७ वर्षांनंतर पुन्हा ‘षड्यंत्र’
By admin | Published: April 21, 2017 1:01 AM