अमरावती - राज्यात अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त भटक्या जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती आणि परीक्षा शुल्कासाठी सन २०१६-१७ या वर्षात २७०० कोटी खर्च झाल्याची आकडेवारी आहे. शिष्यवृत्ती मात्र ७१ टक्के विद्यार्थ्यांनाच मिळाली. त्यामुळे शिष्यवृत्ती निधी वाटपात गौडबंगाल असल्याचा सूर उमटू लागला आहे.सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने शिष्यवृत्तीसाठी चालू वर्षात २७०० कोटींचा खर्च झाल्याची आकडेवारी जारी केली आहे. मात्र, १६ लाख ८४ हजार ६२२ पैकी १२ लाख २ हजार १४७ विद्यार्थ्यांच्याच खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाल्याचे वास्तव आहे. उर्वरित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. गतवर्षीच्या शिष्यवृत्तीचे पैसे अद्याप मिळाले नसताना, सन २०१७-२०१८ या वर्षातील शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती आणि परीक्षा शुल्क कधी मिळेल, याविषयी विद्यार्थी संभ्रमात आहेत. ७१ टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्याचा दावा असला तरी मुळात ४१ टक्केच वाटप झाल्याचे समाजकल्याण विभागाचे संकेत स्थळ सांगत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीप्रकरणी काय सुरू आहे, याचा शोध लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्या पुढाºयांनी घेणे काळाची गरज आहे. आॅनलाइन आणि त्यानंतर आॅफलाइन अशा दोन प्रकारच्या शासननिर्णयांनी विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. यापूर्वी समाजकल्याण आयुक्तांच्या पत्रानुसार ६ लाख ४९ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र असल्याचा डेटा पाठविला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांची आॅफलाइन देयके काढली. परंतु, ही देयके विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाहीत.
अशी निघाली जिल्हानिहाय देयकेसमाजकल्याण विभागाच्या संकेत स्थळवर १७ जानेवारी २०१८ पर्यंत जिल्हानिहाय शिष्यवृत्ती वाटपाची यादी आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यात ५६, ३४१ पैकी ३५,२२६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप झाली. धुळे जिल्ह्यात ३६,५२९ पैकी १४,६४४, गोंदिया जिल्ह्यात ३३,२८१ पैकी १३,५४७, जळगाव जिल्ह्यात ७९,४२४ पैकी ३६,५७१, सातारा जिल्ह्यात ३५,७५४ पैकी १२,८६४, तर वर्धा जिल्ह्यात ४४,२४९ पैकी २०, ३७४ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीची रक्कम वाटप केल्याची आकडेवारी आहे.
सन २०१७-१८ मधील शिष्यवृत्तीचे काय?आॅगस्ट महिन्यात शिष्यवृत्तीची किमान ५० टक्के रक्कम विद्यार्थ्यांना मिळावी, अशी शासन नियमावली आहे. परंतु, गतवर्षीचा गोंधळ निस्तारला नसल्याने सन २०१७-१८ मधील शिष्यवृत्ती कधी मिळेल, याबाबत शंकाच आहे.