एबीजी शिपयार्डची 2,747 कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 11:21 AM2022-09-23T11:21:10+5:302022-09-23T11:21:40+5:30

ईडीची कारवाई; महाराष्ट्र, गुजरातमधील मालमत्तेवर टाच

2,747 crore assets of ABG Shipyard seized | एबीजी शिपयार्डची 2,747 कोटींची मालमत्ता जप्त

एबीजी शिपयार्डची 2,747 कोटींची मालमत्ता जप्त

googlenewsNext

  लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : बँकांना तब्बल २२ हजार ८४२ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एबीजी शिपयार्ड कंपनीचे अध्यक्ष ऋषी अगरवाल यांना बुधवारी सीबीआयने अटक केल्यानंतर गुरुवारी ईडीने कंपनीची महाराष्ट्र आणि गुजरातमधील २,७४७ कोटी ६९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये कंपनीचा गुजरातमधील सुरत आणि दहेज येथील प्रकल्प, महाराष्ट्रातील शेतजमीन, भूखंड, व्यावसायिक आणि निवासी इमारती तसेच बँक खात्यातील रकमेचा समावेश आहे.

कंपनीने आयसीआयसीआय बँकेच्या नेतृत्वाखालील २८ बँकांकडून २३ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ज्या कारणांसाठी या बँकांनी कंपनीला कर्ज दिले होते, त्या कामासाठी प्राप्त कर्जाच्या रकमेचा वापर न करता कंपनीने कर्जापोटी प्राप्त रक्कम देशातील आणि परदेशातील अन्य उद्योगांकडे वळविल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले. 

या प्रकरणात २८ बँकांनी दिलेल्या कर्जापैकी सर्वाधिक फटका स्टेट बँक ऑफ इंडियाला बसला आहे. २,४६८ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. 

स्टेट बँकेने या समूहाला २,४६८ कोटी हे कर्ज थकीत झाल्यावर कंपनीचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. हे कर्ज खाते २०१६मध्येच थकीत कर्ज म्हणून घोषित करण्यात आले.

याप्रकरणी सीबीआयने ७ फेब्रवारी रोजी गुन्हा नोंदवत कंपनीच्या संचालकांचा शोध सुरू केला. या प्रकरणात कंपनीचे अध्यक्ष ऋषी अगरवाल यांच्यासोबत कंपनीचे कार्यकारी संचालक सन्मथ मुथ्थुस्वामी, संचालक अश्विन कुमार, सुशील कुमार अगरवाल, रवी विमल आदींवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे लक्षात आल्यानंतर ईडीने देखील तपासाची सूत्रे हाती घेत तपास सुरू केला होता. तसेच या पूर्वीही ईडीने छापेमारी केलेली होती. 

बुधवारी दुपारी कंपनीच्या अध्यक्षांना सीबीआयने अटक केल्यानंतर गुरुवारी ईडीने पुन्हा एकदा कंपनीच्या संचालकांशी संबंधित कार्यालये तसेच घरांवर छापेमारी करत या मालमत्ता ताब्यात घेतल्या. या छापेमारीमध्ये अनेक संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे ईडीच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली असून, त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येणार आहे. 

Web Title: 2,747 crore assets of ABG Shipyard seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.