उल्हासनगर : २७८ कोटींच्या पाणीपुरवठा वितरण योजनेंतर्गत संपूर्ण शहरात नव्याने जलवाहिन्या टाकण्यात येत असून बहुतांश झोपडपट्टी भागात त्या अर्धवटच असल्याने पाणीप्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करून जलवाहिन्या टाकण्याची मागणी उपमहापौर पंचशीला पवार यांनी आयुक्तांना केली आहे. उल्हासनगरातील जलवाहिन्या ५० वर्षांपूर्वीच्या जुन्या असल्याने ४० टक्के पाण्याची गळती होत असल्याची नोंद पालिकेकडे आहे. ती थांबविण्यासाठी व नागरिकांना शुद्ध मुबलक पाणी देण्यासाठी पालिका केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने २७८ कोटींची पाणीपुरवठा योजना राबवत आहे. योजनेच्या वाढीव टप्प्यात झोपडपट्टीत जलवाहिन्या टाकणार आहेत. मात्र, आता त्या टाकण्यात येणार नसल्याचा आरोप उपमहापौर पवार यांनी केला आहे. तसे झाल्यास झोपडपट्ट्यांतील नागरिकांना पाण्यासाठी घरोघरी भटकण्याची वेळ येणार आहे.महापालिका हद्दीत अधिकृत ४२ तर अनोंदीत १०५ झोपडपट्ट्या असून त्या ठिकाणी पाहणी करून जलवाहिन्या टाकाव्यात, असे त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़योजनेच्या वाढीव ७० कोटींच्या कामात झोपडपट्टीतील अंतर्गत भागात जलवाहिन्या टाकण्यात येणार असून ज्या झोपडपट्टी भागात जलवाहिन्या टाकण्यात येणार नाही. अशा ठिकाणी नव्याने त्या टाकण्यात येणार असल्याचे मत आयुक्त बालाजी खतगावकर यांनी व्यक्त केले. या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सेलवन, उपकार्यकारी अभियंता डी़एऩ बागुल व दिलीप गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
२७८ कोटींच्या पाणीयोजनेत झोपडपट्टीचा विसर
By admin | Published: November 20, 2014 11:28 PM