मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने २७ सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. मुंबई काँग्रेसचा या बंदला पूर्ण पाठिंबा असणार आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सात वर्षांपासून शेतकरी, कामगार आणि युवांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. याविरोधात आम्ही पूर्ण शक्तिनिशी रस्त्यावर उतरू, अशा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी बुधवारी दिला.
भाई जगताप यांनी आज सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आगामी मुंबई महापालिका निवडणुका, राज्यपाल आणि राज्य सरकारमधील संघर्ष अशा विविध विषयांवर भाष्य केले. आगामी पालिका निवडणुकीत काँग्रेस आक्रमकपणे आपली भूमिका मांडणार आहे. सर्व मुंबईकरांना विशेषतः चाळ आणि झोपडीत राहणाऱ्या सर्वांनाच मोफत पाणी मिळायला हवे, ही काँग्रेसची आग्रही भूमिका आहे. वर्षानुवर्षे पाणी माफिया गरिबांकडून पैसे उकळत आहेत. तब्बल ३५ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेला मोफत पाणी देणे अवघड बाब नाही. पालिकेचे पाण्याचे बजेट अवघे १६७ कोटींचे आहे. त्यामुळे सर्वांना मोफत पाणी मिळायला हवे. तसेच, ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचे मालमत्ता कर माफ व्हायला हवे. हे आगामी निवडणुकीत आमचे प्रमुख मुद्दे असतील, असे भाई जगताप यांनी सांगितले.
राज्यात आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये असलो तरी मुंबई महापालिकेत आम्ही विरोधक आहोत. जागतिक पातळीवरील शहरांमध्ये मुंबईचे नाव घेतले जाते. मात्र, मुंबईतील रस्ते, आरोग्य व्यवस्था, स्वच्छता अशा पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नाहीत, असे जगताप यावेळी म्हणाले. आगामी पालिका निवडणुकीत आम्ही आक्रमक राहणार असे सांगतानाच ज्यांनी मुंबईची तुलना पाकिस्तानसोबत केली त्यांच्याविरोधात तर अत्यंत आक्रमकपणे काम करणार. त्यांना त्यांची जागा दाखवून देणार, असे सांगत अभिनेत्री कंगना रनौत तसेच भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे जगताप यांनी यावेळी सांगितले.
मुंबईला बदनाम करण्याचे षडयंत्र
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही जगताप यांनी यावेळी टीका केली. राज्याचे घटनात्मक पदावर असतानाही राज्यपाल एखाद्या राजकीय पक्षाचा एजेंडा चालविल्याप्रमाणे काम करत आहेत. कोविड काळात मुंबईला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपने रचले. त्यात राज्यपालही विविध विधाने करत एकप्रकारे सहायक बनल्याचा आरोपही जगताप यांनी यावेळी केला.