Join us

‘सीसीटीव्ही’मुळे 28 शाळा सुरक्षित; आचारसंहितेमुळे उर्वरित शाळांमध्ये लेटमार्क लागण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:32 PM

बदलापूरच्या शाळेतील प्रकरणानंतर पलिकेच्या शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याच्या कामाला वेग मिळाला आहे.    

मुंबई : पालिकेच्या १२३ इमारतींपैकी २८ शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या महिन्याभरात शहर विभागातील पालिकेच्या १२३ शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण होणार आहे. उपनगरातील शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही सुरू असून आचारसंहितेमुळे त्याला लेटमार्क लागण्याची शक्यता आहे. बदलापूरच्या शाळेतील प्रकरणानंतर पलिकेच्या शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याच्या कामाला वेग मिळाला आहे.    पालिकेच्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात सीसीटीव्ही प्रकल्प आणि किचन गार्डन प्रकल्पाचे ही लोकार्पण मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले. सीसीटीव्ही बसविल्यास शाळा किंवा हद्दीतील एखादी घटना, प्रसंग किंवा गुन्हा त्यामध्ये कैद होऊ शकतो. ही बाब लक्षात घेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तरतूद करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत.    मुंबई पालिका शाळांमधील प्रथमिक आणि माध्यमिक वर्गांमध्ये एकूण तीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिकतात तर साडेसात हजारांपेक्षा जास्त शिक्षक आहेत. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी काही महिन्यांपूर्वी यंत्रणा वारंवार सूचना देऊनही प्रत्यक्षात येत नव्हती. दरम्यान, बदलापूरच्या शाळेतील घटनेनंतर शिक्षणमंत्र्यांकडून याची गंभीर दखल घेत पालिकेला महिन्याभरात शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सीसीटीव्ही बसविण्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली असून लवकरच ती पूर्ण होणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी उपक्रम-  सध्या फास्टफूडच्या आहारी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑरगॅनिक शेतीची माहिती मिळणार.-  विद्यार्थ्यांना भाज्यांची लागवड, वाढ समजणार. -  शाळेच्या इमारतीच्या टेरेसवर भाज्यांचा मळा फुलणार असल्याने आकर्षक उद्यान निर्माण होणार.-  टेरेस गार्डनमुळे शाळा परिसरात शुद्ध हवा निर्माण होण्यास मदत होणार.

पालिका शाळांमध्ये किचन गार्डन-  विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी शाळा प्रशासनाकडून उपक्रम राबविण्यात येत आहेत. -  यात शाळांतील टेरेसवर फळभाज्या पालेभाज्या पिकणे, शेतीविषयक धडे विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहर विभागातील १०३ पालिका शाळेच्या इमारतींवर टेरेस गार्डन उपक्रम सुरू राबविण्यात येत आहे. -  या ठिकाणी विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्यांची लागवड केली जाणार असून या भाज्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या माधान्य भोजनात करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

टॅग्स :सीसीटीव्हीशाळाविद्यार्थी