सीमा महांगडे
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील पालिकेच्या २८ शाळा या लसीकरण केंद्र म्हणून कार्यरत आहेत. उर्वरित पालिका शाळांचे पालिका व्यवस्थापनाकडून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शाळा सुरु होण्याचे निर्देश मिळाले की, २४ महानगरपालिका प्रभागांमधील वॉर्ड अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा शाळांची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असताना पालिकेकडून शैक्षणिक संस्था व शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येणार, असे निर्देश येताच अनेक पालक, विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक यांच्या मनात सुरुवातीला धडकी भरली. लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्या तरी पुढे विद्यार्थी इथेच येऊन शिक्षण घेणार असल्याने त्यांना होणारा संसर्गाचा धोका कसा टाळता येईल, अशी भीती पालक, शिक्षकांना वाटू लागली. मात्र पालिका शिक्षण विभागाकडून ‘त्या’ शाळा व्यवस्थित निर्जंतुक करण्यात आल्या आणि त्यांची साफसफाईही करण्यात आली आहे. सुरुवातीला मुंबईत तब्बल ७२ शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात आणल्या गेल्या, जूनअखेर त्यांची संख्या १९ वर आली आणि आता तर ती त्याहूनही कमी असल्याची माहिती तडवी यांनी दिली. या दरम्यान पालिकेकडून क्वारंटाईन सेंटर म्हणून शाळेचा ताबा सोडल्यावर त्याच्या सॅनिटायझेशन आणि साफसफाईची पूर्ण जबाबदारी पार पाडण्यात आली शिवाय पाणीपट्टी, वीजबिल, शाळेचे भाडे याचीही शाळांना प्रतिपूर्ती करण्यात आली.
मध्यंतरी शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या तेव्हा पालिकेच्या प्रत्येक प्रभागामधील शाळांचे निर्जंतुकीकरण आणि साफसफाई करण्यात आली. पालिकेच्या चतुर्थश्रेणी कामगारांकडून वॉर्ड अधिकाऱ्यांनी ही साफसफाई करून घेतली. भविष्यातही शाळा सुरु होण्यावेळी ही प्रक्रिया पार पाडली जाईल. विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही पालिका शिक्षण विभागाची प्राथमिकता असल्याचे तडवी यांनी सांगितले.
------
कोट
कोविड १९च्या रुग्णसंख्या वाढीच्या काळात शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरणे ही काळाची गरज होती. आता अनलॉक होताना विद्यार्थी आणि त्यांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या योग्यप्रकारे केल्या जाणाऱ्या सॅनिटायझेशनची जबाबदारी पार पाडली जाईल.
राजू तडवी, शिक्षणाधिकारी, पालिका शिक्षण विभाग
--------
चौकट
क्वारंटाईन सेंटर आणि लसीकरण केंद्र म्हणून वापरण्यात आलेल्या पालिका शाळांची सांख्यिकी माहिती :
पालिकेच्या किती शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात आल्या - ७२
जून महिन्यापर्यंत क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात असलेल्या पालिका शाळा - १९
जून महिन्यापर्यंत किती शाळा क्वारंटाईन सेंटर मुक्त करण्यात आल्या - ५३
लसीकरण केंद्र म्हणून वापरात असलेल्या शाळा - २८