म्हाडाच्या लॉटरीसाठी २८ हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 06:00 AM2018-08-05T06:00:13+5:302018-08-05T06:00:22+5:30
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी शनिवारी साडेपाच वाजेपर्यंत २८ हजार ८७५ अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली.
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी शनिवारी साडेपाच वाजेपर्यंत २८ हजार ८७५ अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली. ३४ हजार ५०५ जणांनी नोंदणी केली असून, संकेतस्थळ वापरकर्त्यांची संख्या ६० हजार ४८९ एवढी असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.
केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात परवडणाऱ्या घरांची सर्वाधिक गरज अधोरेखित झाली असताना म्हाडा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाºया घरांची राज्यात सर्वात मोठी म्हणजेच नऊ हजार अठरा सदनिकांची विक्रमी सोडत जाहीर केली होती. १८ जुलैपासून अर्ज नोंदणी प्रारंभ झाली. प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात १९ आॅगस्टला सकाळी दहा वाजता काढण्यात येईल.
सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरढोण (कल्याण) येथील १ हजार ९०५, खोणी (कल्याण) येथील २ हजार ३२ इतक्या अत्यल्प गटातील सदनिका आहेत. या सदनिकांकरिता भारतात स्वमालकीचे घर नसलेले परंतु एमएमआरने अधिसूचित केलेले नागरिकच अर्ज करू शकतात. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तीन लाख इतके मर्यादित आहे.