फिल्मसिटीलगतच्या जंगलात आढळले २८ वायर ट्रॅप; वन्यप्राण्यांच्या तस्करीचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 04:33 AM2019-01-03T04:33:31+5:302019-01-03T04:33:55+5:30
गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात बिबट्या आणि सांबर यांचा वायर ट्रॅप (फासे)मध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
- सागर नेवरेकर
मुंबई : गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात बिबट्या आणि सांबर यांचा वायर ट्रॅप (फासे)मध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी फिल्मसिटीलगतच्या जंगल परिसरात ठाणे वनविभागाचे १५ अधिकारी आणि नऊ प्राणिमित्रांनी शोधमोहीम राबविली. या वेळी वन्यजीवांना पकडण्यासाठी वापरात येणारे २८ वायर ट्रॅप (फासे) विविध ठिकाणांहून नष्ट करण्यात आले. त्या भागातील जीपीएस रिडिंगचीही नोंद करण्यात आली.
वन अधिकारी समीर इनामदार यांनी सांगितले की, वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह स्वयंसेवकांच्या तीन टीम तयार करून शोध घेण्यात आला. जिथे फासे लावले होते, ते काढून टाकण्याचे आदेश अधिकाºयांना देण्यात आले होते. या वेळी एकूण २८ वायर ट्रॅप निदर्शनास आले. यातील काही फासे तारेचे आणि वायरचे होते. हे कृत्य कोणी केले असावे याचा शोध वनविभाग घेत आहे. यामागे वन्यप्राण्यांची तस्करी करणारी एखादी टोळी सक्रिय असल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे. ही शोधमोहीम जंगलाच्या काही भागातच राबविण्यात आली. हा जंगल परिसर जवळपास साडेपाचशे एकरचा आहे, त्यामुळे अजून असे अनेक फासे लावण्यात आले असण्याची शक्यता आहे.
फिल्मसिटी परिसरात महाराष्ट्र सुरक्षा दल आणि चित्रनगरीची स्वत:ची सुरक्षा यंत्रणा तसेच जागोजागी बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. येथे प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाची तपासणी करून प्रवेश दिला जातो. मात्र असे असतानाही हे प्रकार कसे घडतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सुरक्षेची जबाबदारी वनविभागाची
फिल्मसिटीच्या प्रत्येक प्रवेशद्वारापाशी सुरक्षा चौकी आहे. या ठिकाणी रोज सुरक्षारक्षक गस्त घालतात. परंतु बिबट्या आणि सांबर मृत्युमुखी पडल्याची घटना जंगलात घडली आहे. फिल्मसिटी परिसरात बिबट्या दिसला, तर याची माहिती वनविभागाला दिली जाते. जंगलामध्ये वनविभागाची चौकी आहे. जंगलातील घटनेवर वनविभागाचे लक्ष हवे. परंतु वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेकडे अधिक लक्ष दिले जाईल, अशी प्रतिक्रिया फिल्मसिटीचे मुख्य सुरक्षा अधिकारी अशोक जाधव यांनी दिली.