Join us  

लालबाग अपघातात मणियार कुटुंबियांचा आधार गेला; नुपूरवर होती आई-बहिणीची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 3:52 PM

लालबागमध्ये रविवारी झालेल्या भीषण अपघातात २८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Lalbagh Accident : मुंबईत लालबागमध्ये रविवारी भीषण अपघात घडला. लालबागमध्ये अनिंयत्रित बसच्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला. गणेशोत्सव जवळ आल्याने लालबागमध्ये सध्या प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच एका मद्यपीने बसमध्ये केलेल्या राड्यानंतर हा सगळा प्रकार घडला आणि एका तरुणीला जीव गमवावा लागला तर आठजण जखमी झाले आहेत. या अपघातात मणियार कुटुंबाचा एकुलता एक आधार हरपल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

रविवारी रात्री लालबागमध्ये एका बसने नऊ जणांना धडक दिली. या अपघातात जबर जखमी झालेल्या नुपूर मणियारचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. बसमधील एका मद्यधुंद प्रवाशामुळे चालकाकडून स्टीअरिंग घेण्यासाठी धक्काबुक्की केली आणि त्यातच हा अपघात घेतला. मद्यधुंद प्रवाशामुळे मणियार कुटुंबाचा मोठा गेला आहे.

लालबागमधील चिंचपोकळीच्या मुक्ताई बिल्डिंगमध्ये नुपूर मणियार राहत होती. अनियंत्रित बसने नुपूर बसलेल्या दुचाकीला धडक दिली होती. नुपूर तिच्या घरातील एकुलती एक कमावती होती. नुपूरच्या वडिलांचे कोविड काळात निधन झालं होतं. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. नुपूर तिची आई आणि लहान बहीण असे तिघांचे कुटुंब होतं आणि त्यात ती एकटीच कमावती होती. दोन महिन्यांपूर्वीच वडिलांच्या जागी नुपूर कामाला लागली होती. वडील जाण्याचा दुःखातून मणियार कुटुंब सावरलेलं असतानाच आता नुपूरच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, रविवारी ६६ क्रमांकाच्या सायनकडे जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसमधील चालकासोबत एका मद्यधुंद प्रवाशासोबत काळाचौकी येथे वाद झाला. प्रवाशासोबतचे भांडण हमरीतुमरीवर आल्यानंतर त्याने चालकाकडून स्टीअरिंग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. तितक्यात मद्यपीने स्टीअरिंग वळवलं आणि बसने काही वाहनं आणि पादचाऱ्यांना धडक दिली. यामध्ये नऊ जणांना दुखापत झाली होती. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीअपघातमुंबई पोलीस