लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जलवाहतूक आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी, तसचे बंदरांच्या विकासासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडून देश-विदेशातील गुंतवणूकदारांसोबत तब्बल २८ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.२ ते ४ मार्चदरम्यान पार पडलेल्या ‘भारत सागर परिषदे’अंतर्गत हे करार करण्यात आल्याची माहिती पोर्ट ट्रस्टकडून देण्यात आली. २ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. आभासी पद्धतीने पार पडलेल्या या परिषदेत जवळपास १०० देशांतील १.७ लाख प्रतिनिधी, तसेच ८ देशांचे मंत्री, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या ५० कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि १६० वक्ते सहभागी झाले होते.‘महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी’ या विषयावरील परिसंवादात बोलताना मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी राज्यातील बंदर आणि सागरी क्षेत्रात ५५ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती दिली. यासाठी विविध गुंतवणूकदारांसोबत ५७ सामंजस्य करार करण्यात आले. इतक्या मोठ्या गुंतवणुकीमुळे राज्यातील सागरी क्षेत्राचा झपाट्याने विकास होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.दरम्यान, मुंबई पोर्ट ट्रस्टने देश-विदेशातील गुंतवणूकदारांसोबत केलेल्या २८ हजार कोटींच्या सामंजस्य करारांमुळे वॉटर टॅक्सी, क्रूझ टर्मिनल, जहाज दुरुस्ती, मरिना आणि जेट्टींच्या विकासाला चालना मिळणार आहे.
सागरी परिषदेचा उद्देश काय?देशातील बंदरांचा विकास, बंदरांना रस्ते आणि रेल्वे मार्गांशी जोडणे, जलवाहतूक, समुद्री पर्यटन आणि मालवाहतूक या क्षेत्रांत मोठ्या गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ‘भारत सागर परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. याआधी २०१६ साली ही परिषद पार पडली होती.