Join us

राष्ट्रपतिपदासाठी २८३ आमदारांचे मतदान; चौघे मतदानापासून वंचित, मतपेटी दिल्लीकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 5:48 AM

शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांना निवडणूक आयोगाने मतदानापासून रोखल्याने मतदान करू शकले नाहीत. 

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रपतिपदासाठी सोमवारी  झालेल्या मतदानात राज्यातल्या एकूण २८७ पैकी २८३ आमदारांनी मतदान केले.  चार जण मतदानाला उपस्थित राहू शकले नाहीत. भाजपचे लक्ष्मण जगताप आजारी असल्याने, माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुरुंगात असल्याने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांना निवडणूक आयोगाने मतदानापासून रोखल्याने ते मतदान करू शकले नाहीत. 

विधान भवनात सकाळी १० पासून मतदानाला सुरुवात झाली.  सर्वांत आधी माजी मंत्री काँग्रेसचे नितीन राऊत यांनी, तर  सर्वांत शेवटी सपाचे आमदार अबू आझमी यांनी मतदान केले.  नितीन राऊत यांनी आपल्या क्रमांकाच्या आधी मतदान केले. त्यांनी नियमबाह्य पद्धतीने मतदान केल्याचा आक्षेप भाजपच्या बबनराव लोणीकर यांनी घेतला आहे. महेंद्र दळवी यांना मारहाणीच्या एका प्रकरणात तीन वर्षांपूर्वी अलिबागच्या न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याला दळवी यांनी वरच्या न्यायालयात आव्हान दिले असले तरी शिक्षा आधीच सुनावली गेली असल्याने त्यांना मतदान करता येणार नाही असे पत्र दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानमंडळ सचिवालयाकडे पाठविले होते. आधी झालेल्या विधान परिषद व राज्यसभा निवडणुकीत मात्र त्यांनी मतदान केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०० आमदार एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असा दावा केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दावा केला, की हा आकडा दोनशे पार जाईल. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे एकही मत फुटणार नाही, सर्व मते यशवंत सिन्हा यांनाच मिळतील, असा विश्वास मतदानापूर्वी व्यक्त केला. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले, की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. आम्ही तो आदेश पाळत त्यांना मतदान केले. 

विश्वासदर्शक ठरावानंतर सर्वपक्षीय आमदार आज विधानभवनात या मतदानाच्या निमित्ताने एकत्र आले होते. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील काही आमदार एकमेकांशी सौहार्दाने बोलताना दिसले.

मतपेटी सीलबंद करून वाहनाद्वारे मुंबई विमानतळाकडे रवाना

- महाराष्ट्र विधानभवनातील सेंट्रल हॉल येथील मतदान केंद्रात आज राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठीची निवडणुक प्रक्रिया सायंकाळी ५ वाजता पूर्ण झाली. 

- त्यानंतर मतपेटी (बॅलेट बॉक्स) आणि इतर आवश्यक निवडणूकविषयक साहित्य सीलबंद करुन ते सुरक्षेमध्ये वाहनाद्वारे सायंकाळी मुंबई विमानतळाकडे रवाना करण्यात आले. तेथून रात्री ९.५५ वाजताच्या विमानाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतपेटी दिल्लीकडे रवाना झाली.

- भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक अमित अग्रवाल, भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव एस. बी. जोशी, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, दोन्ही राजकीय पक्षाकडील पोलींग एजंट आमदार श्रीकांत भारतीय, आमदार डॉ. वजाहत मिर्जा अथर मिर्झा आदी उपस्थित होते. 

टॅग्स :राष्ट्रपती निवडणूक 2022महाराष्ट्र