Join us  

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगत नाले आणि ड्रेन सफाईसाठी २८५ कोटी 

By जयंत होवाळ | Published: January 24, 2024 12:18 PM

संपूर्ण शहरातील नाल्यांमधून अंदाजे ११ लाख टन गाळ निघेल असा अंदाज आहे. 

मुंबई : पावसाळापूर्व नालेसफाईची मुंबई महापालिकेने तयारी सुरु केली असून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगत पावसाचे पाणी वाहून नेणारे ड्रेन तसेच नाले सफाईसाठी २८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा खर्चात २० टक्के वाढ झाल्याचे कळते. या कामासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. पूर्व आणि पश्चिम हे दोन्ही महामार्ग पूर्वी एमएमआरडीए कडे होते. मात्र रस्त्यांची  देखभाल करण्यासाठी एकच यंत्रणा असावी, त्यासाठी हे दोन्ही मार्ग आमच्या ताब्यात द्यावेत, अशी विनंती  पालिकेने मध्यंतरी  न्यायालयाला  केली होती. या विनंतीची दखल घेत हे महामार्ग पालिकेकडे सुपूर्द करण्यात आले. साहजिकच या महामार्गांची देखभाल आणि दुरुस्तीची   जबाबदारी पालिकेकडे आली आहे. 

त्यानंतर आता पावसाळापूर्व कामे पालिका हाती घेणार आहे. पश्चिम दुतगती महामार्गालगत पावसाचे पाणी वाहून नेणारे ड्रेन साफ करण्यासाठी १४५  कोटी, तर पूर्व द्रुतगती महामार्गासाठी ८० कोटी रुपये खर्च आहे. त्यादृष्टीने पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. संपूर्ण शहरातील नाल्यांमधून अंदाजे ११ लाख टन गाळ निघेल असा अंदाज आहे. नालेसफाई  आणि ड्रेन सफाई अशी दोन्ही कामे होणार आहेत. पूर्व उपनगरातील पाच वॉर्डात मुख्य रस्त्याला असणारे काही संलग्न रस्ते आहेत. त्यासाठी स्वतंत्र निविदा काढल्या जाणार आहेत. एम आणि एल वॉर्डातील ड्रेन सफाईसाठी १. ९ कोटी तर एन, एस आणि टी वॉर्डांसाठी ३.५  कोटी रुपयांची निविदा काढली जाणार आहे. या वॉर्डातील कामांसाठी एवढा  खर्च आहे.

संपूर्ण मुंबईत ३०९ मोठे ड्रेन आणि चार नद्या आहेत. २९० किमी क्षेत्रफळात हे जाळे पसरलेले आहे. शहर  भागात ६०५ किमी लांबीचे ५०८ लहान नाले आहेत. तर १०० वर्ष जुन्या ४७५ किमी लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे दक्षिण मुंबईत आहे.  

टॅग्स :मुंबई