मुंबईत प्रदूषण करणाऱ्या ४ कंपन्यांना २८६ कोटी दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 05:25 AM2020-08-19T05:25:37+5:302020-08-19T05:26:05+5:30
हवेच्या प्रदूषणाने नागरिकांना सोसाव्या लागणा-या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीही ही रक्कम वापरली जाईल.
मुंबई : हवेच्या प्रचंड प्रमाणावरील प्रदूषणाने ईशान्य मुंबईतील अंबापाडा, माहुल व चेंबूर या भागांची अवस्था ‘गॅस चेंबर’सारखी करून तेथे राहणाºया लाखो नागरिकांच्या आरोग्यास गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण केल्याबद्दल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, सी लॉर्ड कन्टेनर्स आणि एजिस लॉजिस्टिक्स या चार कपन्यांना एकूण २८६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम त्या भागातील हवा प्रदूषणाची स्थिती पूर्वपदावर आणण्याची योजना तयार करणे व त्यासाठी योजाव्या लागणाºया उपायांवर खर्च करायची आहे. हवेच्या प्रदूषणाने नागरिकांना सोसाव्या लागणा-या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीही ही रक्कम वापरली जाईल.
>कोणत्या कंपनीला किती दंड?
प्रदूषणात या चारपैकी प्रत्येक कंपनीचा हिस्सा किती व त्याचे पैश्याच्या स्वरूपात मूल्य किती याचा हिशेब करण्याचे काम न्यायाधिकरणाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळावर सोपविले होते. मंडळाने त्यासंबंधीचा अहवाल गेल्या मार्चमध्ये सादर केला. सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन भरपाईपोटी दंडाचा हा आदेश दिला. त्यानुसार हिंदुस्तान पेट्रोलियमला ७६.५ कोटी रु, भारत पेट्रोलियमला ७२.५ कोटी रु., एजिस लॉजिस्टिक्सला १४२ कोटी रु. तर सी लॉर्ड कन्टेनर्सला २० लाख रुपयांचा दंड करण्यात आला.
दंडाची ही रक्कम जेव्हा गरज पडेल तेव्हा खर्च करण्यासाठी दोन्ही
पेट्रोलियम कंपन्यांनी स्वतंत्र खात्यांत तर अन्य दोन कंपन्यांनी एक्स्रो खात्यांत सुरक्षित ठेवायची आहे.