मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटीच्या प्रवाशांसाठी असणाऱ्या सर्व योजना केवळ कागदावरच आहेत. गेल्या काही दिवसांत एसटीचेअपघात वाढत आहेत. गेल्या वर्षभरात एसटी महामंडळाच्या २,२८६ गाड्यांच्या अपघातात पादचारी, प्रवासी व कर्मचारी अशा एकूण २८७ जणांनी जीव गमावला असून ३,०३४ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ९९५ गंभीर जखमी झाल्याची माहिती आकडेवारीवरून समोर आली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचवणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १४ हजार गाड्या असून ३४ हजार वाहक व चालक आहेत. वर्षभरात जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ अखेरपर्यंत एसटीच्या २,२८६ गाड्यांचे अपघात झाले. एसटीचे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी महामंडळाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
दुचाकी वाहनांमुळे अपघात अधिक एसटी महामंडळाच्या गाड्यांचे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्येक चालकाला सुरक्षित वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. एसटीचा अपघात झाल्यावर चालक तणावात जातो, त्यामुळे चालकाला १० दिवस सुट्टी देण्यात येते. तसेच त्याचे समुपदेशन केले जाते. त्यामुळे एसटीच्या अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. एसटी गाड्यांना होणाऱ्या अपघातांमध्ये ६५ ते ७० टक्के अपघात दुचाकी वाहनचालकांच्या चुकीमुळे होत असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.