लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुर्ला पूर्व येथे असलेली स्वदेशी मिल २००० मध्ये बंद पडली. या मिल व्यवस्थापानाकडे थकीत असलेली कामगारांची देणी द्यायला नुकतीच सुरुवात झाली असून, यामुळे २८९६ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
स्वदेशी मिलमधील जातू कामगार, बदली कामगार व सेवानिवृत्त कामगार असे एकूण २८९६ कामगारांना सरासरी ५०,००० प्रमाणे एकूण १४ कोटी ५० लाखांचे वाटप सरकारने नेमलेल्या प्रशासकाकडून सुरू झालेले आहे. तसेच ४७० बदली कामगारांना मिल व्यवस्थापनाकडून एकूण २ कोटी ५० लाखांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. धनादेशचे वाटप स्वदेशी मिल कामगार संयुक्त समिती व स्थानिक नगरसेविका सान्वी तांडेल यांच्या उपस्थित पार पडले. सुरुवातीला १० कामगारांना धनादेश देण्यात आले, उर्वरित बदली कामगारांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे. बाकी अंतिम रक्कम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लवकरात लवकर मिळण्यासाठी कमिटी व व्यवस्थापन यांचे प्रयत्न सुरू आहेत.
ही तर वचनपूर्ती
कामगारांना त्यांची हक्काची देणी मिळावी यासाठी २०१४ पासून सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्तीमुळे तोडगा निघाला. कामगार संघटनांनी व्यवस्थापनाची चर्चा केली. आता कामगारांना प्रत्येकी ५०००० देण्यात येत आहे. २०१४ निवडणुकीत आश्वासन दिले होते ते पूर्ण झाले आहे.
मंगेश कुडाळकर, आमदार