मुंबई : २०२१ वर्षात पहिल्या तीन महिन्यातच भारतातील सात शहरांमध्ये घर खरेदीत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना काळात रियल इस्टेट क्षेत्राला काही प्रमाणात झळ बसल्यानंतर घरांच्या विक्रीबाबत रिअल इस्टेट क्षेत्रात प्रश्नचिन्ह उभे होते; मात्र २०२१ मध्ये पहिल्या तीन महिन्यांमध्येच घर खरेदीत २९ टक्क्यांनी वाढ झाली. ही वाढ २०२० च्या पहिल्या तीन महिन्यांपेक्षाही अधिक आहे. ॲनारॉकने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि एनसीआर या सात शहरांमध्ये मिळून २०२१च्या तीन महिन्यांत ५८ हजार २९० घरांची विक्री झाली. २०२० च्या पहिल्या तीन महिन्यात एकूण ४५ हजार २०० घरांची विक्री झाली होती. यामुळे कोरोना काळातही रिअल इस्टेट क्षेत्रात नागरिक गुंतवणूक करत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे आणि मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक घर खरेदी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. या सात शहरांच्या यादीत बंगळुरू मध्ये घर खरेदीमध्ये कमी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे आणि हैदराबाद येथे यावर्षी सर्वाधिक घरे बांधून तयार होती. त्यामुळे या शहरांमध्ये नागरिकांनी घर खरेदीला चांगला प्रतिसाद दिला. ॲनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले की मुद्रांक शुल्कात करण्यात आलेली कपात, गृहकर्जावर बँकांचे आकर्षक व्याजदर, तसेच विकासकांनी ग्राहकांसाठी ठेवलेले डिस्काउंट ऑफर यांमुळे घर खरेदीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. तसेच कोरोना काळानंतर २०२१ मध्ये अनेक नवीन गृह प्रकल्प तयार करण्यात आले. यामुळे घर खरेदी वाढली. मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये भारतात सर्वाधिक घरांच्या किमती असूनदेखील नागरिकांनी येथे मोठ्या प्रमाणात घर खरेदी केली. रियल इस्टेट क्षेत्रासाठी ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.
पहिल्या तीन महिन्यांत झालेली घर खरेदी मुंबई महानगर क्षेत्र : २०,३५० पुणे : १०,५५० एनसीआर : ८,७९० बंगळुरू : ८,६७० हैदराबाद : ४,४०० चेन्नई : २,८५० कोलकाता : २,६८०