-सीमा महांगडे
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा ‘नांदेड पॅटर्न’ यंदा यशस्वी झाला आहे. २०२० मधील परीक्षेच्या तुलनेत यंदा कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८० टक्क्यांनी घटली असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. राज्यभरात कॉपीमुक्त परीक्षेसाठी यावेळी महसूल, जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भरारी पथके नेमल्याने हा पॅटर्न यशस्वी ठरला असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र तरीही मुंबई विभागात दहावीची १० आणि बारावीची १९ कॉपी प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे मंडळाकडून इशारा देऊनही कॉपी करणाऱ्या या कॉपी बहाद्दरांवर आता काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
कोरोनापूर्वी झालेल्या २०२० मधील बोर्डाच्या परीक्षेत दहावीतील ५८९ तर बारावीचे ९९६ विद्यार्थी कॉपी करताना आढळले होते. यंदा हे प्रमाण खूपच घटले असून दहावीच्या परीक्षेत ११३ तर बारावीचे २६० विद्यार्थ्यांवर कॉपी केल्याने कारवाई करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेवेळी नाशिक विभागातील ३३, छत्रपती संभाजी नगर विभागातील २९, नागपूर विभागात २५ आणि पुणे विभागात २१ विद्यार्थी कॉपी करताना सापडले होते. दुसरीकडे, बारावीच्या परीक्षेत छत्रपती संभाजी नगर विभागातील सर्वाधिक ७३ विद्यार्थी तर त्यापाठोपाठ पुणे विभागातील ७२ आणि नागपूर विभागातील ४७ विद्यार्थी आहेत.
कोकण विभागात एकही विद्यार्थी कॉपी करताना सापडलेला नाही. तसेच कोल्हापूर, लातूर व कोकण विभागात दहावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली. बुलढाणा जिल्ह्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला, पण इतर ठिकाणी तसा गंभीर प्रकार कुठेही झालेला नाही. यंदा कॉपीमुक्त पॅटर्नमध्ये आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करून आगामी परीक्षेपूर्वी त्यात सुधारणा केल्या जातील, असेही मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मुलांमध्येही आता भितीचे वातावरण असून आपण पकडले जाऊ अशी भावना त्यांच्या मनाला सतत सतावत असते.