मुंबई, दि. 17- सासू-सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून मुंबईतील धारावी भागातल्या एका 29 वर्षीय तरूणाने आत्महत्या केली आहे. लक्ष्मण विजय सोनवणे असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. पत्नीचे आई-वडील लक्ष्मण तसंच त्यांच्या घरातील इतरांना त्रास देत असल्याने त्यांनी त्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी ही गोष्ट नमूद केली आहे. तसंच त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या त्यांच्या पत्नीच्या आई-वडिलांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी या सुसाईड नोटमधून केली आहे.
आणखी वाचाअवघ्या १५ मिनिटांत दोघांच्या आत्महत्यासर्वोच्च न्यायालयाच्या संतापानंतर इशरत जहाँ प्रकरणातील पोलीस अधिका-यांची पद सोडण्याची तयारी
लक्ष्मण सोनवणे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, 'माझ्यामुळे माझ्या अपंग आई आणि वृद्ध वडिलांना होणाऱ्या त्रासाला मी कंटाळलो आहे. म्हणूनच हे असलं आयुष्य आता नको वाटतं. माझ्या सासू-सासरे आणि पत्नीमुळे आई-वडिलांना होणारा त्रास आता नको वाटतोय. आता तर ही लोक माझ्या भाऊ-बहिण आणि वहिनीच्या पण मागे लागली आहेत. रोज काहीतरी खोट सांगून भांडण करतात. तसंच पत्नीला सोडचिठ्ठी दे आणि सहा ते दहा लाख रूपये दे अशीही मागणी करतात. आमच्या लग्नाला चार वर्ष झाली. लग्नानंतर माझ्या पत्नीच्या शिक्षणासाठी मी पैसे खर्च केले. पण ते पैसे आपण खर्च केल्याचं सासरची लोक बोलतात. म्हणूनच आज मी माझ्या बायको आणि सासू-सासऱ्यांमुळे आत्महत्या करतो आहे. यामध्ये माझ्या आई-वडिलांना, भाऊ वहिनीला दोष देऊ नका. तसंच माझ्या नावावरचे पैसे ही त्यांना देऊ नका'.
सुसाईड नोटमध्ये लक्ष्मण यांनी सासू-सासरे आणि पत्नीवर कडक कारवाईची मागणी केली आहे. तसंच आत्महत्येचं पाऊल उचलल्याने त्यांनी घरच्यांची माफीही मागितली आहे.