290 उद्योजकांनी केला करार; दोन लाख ३ हजार रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:07 PM2023-07-19T12:07:40+5:302023-07-19T12:08:14+5:30
दोन लाख ३ हजार रोजगार होणार उपलब्ध; ठाण्यात झाला कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ या संकल्पनेतून ‘इंडस्ट्री मीट’ हा मुंबई विभागातील नामांकित उद्योग, उद्योजक, उद्योजकांच्या संस्था, नोकरी देणाऱ्या संस्था व मोठे लेबर कंत्राटदारांसाठी पार पडला. यावेळी तब्ब्ल २९० उद्योजक, संस्थांनी शासनाशी सामंजस्य करार शनिवारी ठाण्यात केला. त्याद्वारे दोन लाख ३ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठाणेसह राज्यभरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आयटीआयच्या प्राचार्यांचा सत्कार करून पारितोषके देऊन सन्मानित करण्यात आले.
ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा विभागीय ‘इंडस्ट्री मीट’चा कार्यक्रम शनिवारी पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते. मात्र, नाशिक दौऱ्यावरून येण्यास विलंब झाल्यामुळे ते उपस्थित राहिले नाहीत. मात्र, या कार्यक्रमास लोढा यांच्यासह कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, कौशल्य विकास आयुक्त रामास्वामी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, कोकण विभागीय अपर आयुक्त किसन जावळ, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी उपस्थित होते.
वागळे इस्टेट येथील आयटीआयचे तत्कालीन प्राचार्य श्याम अंबाळकर यांना मुंबई विभागातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हणून गौरवून एक लाख रुपयांच्या धनादेशाच्या पारितोषिकासह मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तर नावीन्यता सोसायटी, ठाणे जिल्हा परिषद व निओमोशन कंपनीच्या वतीने १५ दिव्यांगांना नावीन्यपूर्ण व्हीलचेअरचे वाटप यावेळी करण्यात आले. यावेळी आमरावतीच्या आयटीआयसह नाशिक, औरंगाबाद, पुणे आदीं विभागातील उत्कृष्ट आयटीआयच्या प्राचार्यांचा सन्मान करण्यात आला.
सरकार सर्व सहकार्य करणार
n देशातील अनेक समस्यांचे मूळ हे बेरोजगारी असून ती दूर करण्यासाठी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
n त्यासाठी उद्योगांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योगांनी त्यांच्या कारखान्यात, बांधकामाच्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारावे.
n त्यासाठी राज्य शासन सर्व परवाने देऊन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन लोढा यांनी दिले.
n यावेळी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे प्रादेशिक प्रमुख मोहम्मद कलाम, एल अँड टी स्कील ट्रेनर्स अकादमीचे प्रमुख बी.ए. दमाहे आदींसह शिनगारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र इनोव्हेशन चॅलेंजचे अनावरण मंत्र्यांच्या हस्ते झाले.
n या कार्यक्रमाला उद्योग जगतातील अनेक मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.