Join us

आगी बसना, झळ प्रवाशांना; बेस्टच्या २९७ बस ठरताहेत अपुऱ्या, मुंबईकरांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 7:00 AM

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात १,८०० भाडेतत्त्वावरील बसेस असून मातेश्वरी कंपनी, हंसा सिटी बस प्रा.लि., डागा व एम.पी. ग्रुप या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे.

मुंबई - मुंबईकरांना किफायतशीर आणि दर्जेदार सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसना गेल्या काही दिवसांपासून आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या महिनाभरात बेस्टच्या तीन बस जळून खाक झाल्या. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील ४०० बस बंद करण्याचा निर्णय घेतला. ऐन परीक्षा काळात विद्यार्थी व सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता उपक्रमाने इतर मार्गावरील २९७ गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी या गाड्या अपुऱ्या पडत असून मुंबईकरांचे हाल सुरूच आहेत.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात १,८०० भाडेतत्त्वावरील बसेस असून मातेश्वरी कंपनी, हंसा सिटी बस प्रा.लि., डागा व एम.पी. ग्रुप या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना वेतन देता येत नाही म्हणून एम.पी. ग्रुपने आधीच गाशा गुंडाळला आहे. तर मातेश्वरी, हंसा आणि डागा या तीन कंपन्यांकडेच बेस्ट बसेस चालवण्याचे कंत्राट आहे. त्यापैकी मातेश्वरी कंपनीच्या तीन बसेस महिन्याभरात जळाल्या. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांनंतर प्रवाशांची सुरक्षा पाहता उपक्रमाने मे. मातेश्वरी कंपनीच्या गाड्या न चालवण्याचा निर्णय घेतला.

महिन्याभरात बेस्टच्या तीन बसना आग लागल्याच्या घटनेनंतर बेस्ट प्रशासनाने ४०० बस रस्त्यावर न चालवण्याचा निर्णय घेतला. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असताना हा निर्णय कसा घेतला जाऊ शकतो? गाड्यांचे मेंटेनन्स नीट न झाल्याने आगीच्या घटना घडत आहेत. बस बंद ठेवण्याची शिक्षा सामान्य मुंबईकरांना का? - रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेस  

लखनऊच्या टीमकडून गाड्यांची तपासणी बेस्ट बसला आग लागण्याच्या घटना पुन्हा घडू नये, यासाठी टाटा मोटर्सची एक टीम लखनऊ येथून मुंबईत आली आहे. सुरक्षा नियमांचे पालन करत या सर्व बसची पुन्हा तपासणी इंजिनीअरकडून केली जात आहे. बसची तपासणी पूर्ण केल्यावर व आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर या बस सेवेत ठेवल्या जातील. येत्या आठवडाभरात ही तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे,  अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.

अचानक ४०० बस बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. इतकेच नव्हे तर बारावीच्या परीक्षा सुरू असून बसेस अभावी विद्यार्थ्यांना रिक्षा, टॅक्सीचा आधार घ्यावा लागत आहे. हे लक्षात घेता बेस्ट उपक्रमाने सकाळपासून इतर ताफ्यातील २९७ गाड्या विविध मार्गांवर आवश्यकतेनुसार चालवण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी या गाड्या प्रवाशांना अपुऱ्या पडत असून लोकांचे हाल होत आहेत. या प्रकरणी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :बेस्ट