मुंबई : उपनगरीय लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफ लाइन. दररोज 80 लाखांपेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यांतून प्रवास करतात. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेला गर्दी होत असल्याने दरवाजावर लटकूनही प्रवास केला जातो. यामुळे लोकलमधून तोल जाऊन मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी लोकलमधून ट्रॅकवर पडतात किंवा ट्रॅक ओलांडताना मृत्यू होतो.
भारतीय रेल्वेला मुंबईतून सर्वाधिक महसूल प्राप्त होतात. तरीसुद्धा भारतीय रेल मुंबईकरांचा सुरक्षेसाठी गंभीर नाही, कारण मुंबईत रेल्वे ट्रॅकमध्ये 2018 मध्येही काही विशेष बदल झालेला नाही. 2018 मध्ये 2981 प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. तर 3349 प्रवासी जखमी झाले आहेत. ही बाब माहितीच्या अधिकारात समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलिसांकडे ही माहिती मागितली होती. यानुसार मध्य रेल्वे मार्गावर एकूण 1933 प्रवाशांचा मृत्यू आणि 1920 प्रवासी जखमी झाले आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण 1048 प्रवाशांचा मृत्यू आणि 1429 प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वे ट्रॅक ओलांडताना 1619 जण ठार झाले आहेत. चालत्या गाडीमधून पडल्याने 711 प्रवाशांचा मृत्यू तर 1584 जण जखमी झाले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे पटरीच्या दोन्ही बाजू सुरक्षा भिंत बांधण्याच्या आदेश दिले आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप शेख यांनी केला आहे.