Join us  

लवकरच येणार नव्या एसी लोकल; मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 3:12 PM

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवी ट्रेन येणार

मुंबई: लवकरच मुंबईकरांच्या सेवेत नव्या एसी लोकल दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे या लोकलमध्ये अनेक नव्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. चार दिवसांपूर्वीच ट्रेन 18 या देशातील सर्वात हायस्पीड गाडीची यशस्वी चाचणी झाली. नव्या एसी लोकलची रचनादेखील त्याच धर्तीवर करण्यात आली आहे. त्यामुळे या ट्रेनमुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसह्य होऊ शकतो. सध्या चर्चगेट ते विरार मार्गावर एसी लोकल धावतात. त्या ट्रेनच्या तुलनेत नव्या गाड्यांची क्षमता अधिक आहे. सध्याच्या एसी लोकलच्या तुलनेत नव्या गाडीत 350 अधिक प्रवासी (50 बसलेले अधिक 300 उभे) सामावू शकतात. सध्या सेवेत असलेल्या लोकलप्रमाणेच नवी लोकलदेखील 12 डब्यांची असेल. मात्र या लोकलची क्षमता जास्त असेल. सध्याच्या ट्रेनमधील सहा डबे एकमेकांना पूर्णपणे जोडलेले आहेत. त्यामुळे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येतं. मात्र नव्या ट्रेनचे सर्व डबे एकमेकांशी पूर्णपणे जोडलेले आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवी एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकते.मुंबईत पहिली एसी लोकल गेल्या वर्षी 25 डिसेंबरला धावली. सध्या एसी लोकलच्या दिवसाला 12 फेऱ्या होतात. ही ट्रेन शनिवारी आणि रविवारी धावत नाहीत. त्यावेळी देखभालीसाठी एसी लोकलची सेवा बंद असते. या ट्रेनमधून दररोज सरासरी 1500 मुंबईकर प्रवास करतात. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात अजून दोन एसी लोकल दाखल झाल्यास ही सेवा शनिवारी आणि रविवारीदेखील देता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मध्य रेल्वेला येत्या जूनमध्ये एसी लोकल मिळण्याची शक्यता आहेत.  

टॅग्स :मुंबईएसी लोकललोकलपश्चिम रेल्वे