Join us

‘एमबीए’च्या द्वितीय वर्षाला आता थेट प्रवेश मिळणार; इंजिनीअरिंग, ‘बीबीए’चे पदवीधारक पात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 7:32 AM

या विद्यार्थ्यांना लॅटरल एंट्रीद्वारे थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे.

मुंबई : आता ‘एमबीए’ आणि ‘एमसीए’ अभ्यासक्रमांच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळू शकणार आहे. यातील ‘एमबीए’ अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश देण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू करण्याचे नियोजन राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्षाने (सीईटी सेल) केले आहे.

आतापर्यंत तीन किंवा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ‘एमबीए’ची पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक होते; मात्र आता इंजिनिअरिंग आणि बी.टेक. केलेले, तसेच ‘बीबीए’ आणि ‘बीएमएस’ या व्यावसायिक अभ्यासक्रमांची चार वर्षांची पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी एमबीए अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ शकतील. या विद्यार्थ्यांना लॅटरल एंट्रीद्वारे थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतूद

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थांना थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, ‘एनईपी’तून चार वर्षांची पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच बाहेर पडण्यासाठी अद्याप काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सध्या चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षाला प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने त्याला मान्यता दिली आहे, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

टॅग्स :शिक्षण